Last Updated on 07 Jul 2026 2:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
‘प्रकाश हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, उरुण-ईश्वरपूर’ येथे वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत आव्हानात्मक आणि दुर्मिळ मानली जाणारी ‘सिम्पॅथेटिक चेन श्वानोमा’ (मानेची गाठ) ही अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. जगभरात आतापर्यंत अवघ्या ६० ते १०० केसेसची नोंद असलेल्या या आजारावर यशस्वी उपचार करून रुग्णाला नवीन आयुष्य देण्यात आले आहे.
पन्हाळा तालुक्यातील एका ३० वर्षीय महिलेच्या मानेच्या डाव्या बाजूला एक गाठ होती आणि या गाठीमुळे रुग्णाला मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. जेव्हा हे रुग्ण प्रकाश हॉस्पिटल येथे आले, त्यावेळी रुग्णाची सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एम.आर.आय., व्हिडिओलॅरिन्गोस्कोपी आणि यु.एस.जी. गायडेड FNAC या अत्याधुनिक तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांनंतर नेत्ररोग तज्ज्ञ व भूलतज्ज्ञांचा विशेष सल्ला घेऊन रुग्णाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सदरच्या शस्त्रक्रियेसाठी विशेष दक्षता बाळगण्यात आली असल्याने शस्त्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाली नाही. मानेला असणारी ही गाठ काढायला जवळपास साडेतीन तासांचा कालावधी लागला. मानेचा भाग नसा आणि रक्तवाहिन्यांनी वेढलेला असल्याने ही शस्त्रक्रिया अत्यंत नाजूक व गुंतागुंतीची होती. गाठीचा आकार: ७.५ सेमी X ५.५ सेमी X ३.५ सेमी हा मानेच्या भागाचा विचार करता बऱ्यापैकी मोठा आकार आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला ‘SICU’ विभागात दाखल करण्यात आले.
सदरची गाठ ‘हिस्टोपॅथॉलॉजी’ तपासणीसाठी पाठविण्यात आली असता, ही गाठ अत्यंत दुर्मिळ अशी ‘सिम्पॅथेटिक चेन श्वानोमा’ (Sympathetic Chain Schwannoma) असल्याची खात्री झाली.
ही शस्त्रक्रिया अतिजोखमीची व अत्यंत दुर्मिळ स्वरूपाची होती. ही यशस्वी शस्त्रक्रिया कान, नाक आणि घसा (ENT) विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राजेश करंबेळकर यांच्यासह डॉ. श्रेयश जोशी, डॉ. सुष्मिता सुल्ह्यान तसेच डॉ. मयूर पवार, डॉ. करिष्मा सोनवणे, डॉ. सेजल पाटील तसेच भूलतज्ज्ञ डॉ.संगिता सायमोते, ओटी व नर्सिंग स्टाफ यांच्या मोलाच्या सहकार्याने पार पडली. या शस्त्रक्रियेसाठी प्रकाश हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूपाल गिरीगोसावी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
विशेष बाब म्हणजे, ही लाखो रुपयांची अतिजोखमीची शस्त्रक्रिया ‘एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ अंतर्गत रुग्णावर पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे. या ऐतिहासिक शस्त्रक्रियेनंतर डॉ. राजेश करंबेळकर यांच्या संपूर्ण वैद्यकीय पथकाचे परिसरातून व वैद्यकीय क्षेत्रातून कौतुक केले जात आहे.











































































