Last Updated on 01 Jul 2026 10:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण व वृक्षदिंडी
कराड :
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाची गरज अधिक महत्त्वाची बनली आहे. या संकटावर मात करण्यासाठी वृक्षारोपण हा प्रभावी उपाय आहे. पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा कृष्णा परिवाराचा संकल्प आहे, असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कारखाना संचलित जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात स्व.वसंतराव नाईक जयंती व महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण, वृक्षदिंडी कार्यक्रमात ते बोलत होते. कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास नवनिर्वाचित संचालक बाबासो शिंदे, बाजीराव निकम, जे डी.मोरे, सुनील पाटील, बाजीराव थोरात, बाळासो जगताप, संग्राम पाटील, छबन कांबळे, सुजाता जाधव, सुनीता शेवाळे, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, एम.के.कापुरकर, वसंतराव पवार, संजय शेवाळे आदी उपस्थित होते.
डॉ. सुरेश भोसले पुढे म्हणाले, जगभरात हवामान बदलाचे परिणाम दिसू लागले आहेत. आपल्याकडे पाऊस लांबला आहे. त्यामुळे या बदलाचा विचार करून भविष्यात शेती करावी लागणार आहे. मोठ्या प्रमाणात जंगलतोड, उत्खनन, हरितगृह वायूंचे वाढते उत्सर्जन या विविध कारणांमुळे सगळीकडे हवामान बदल झालेला दिसून येत आहे. या संकटावर मात करण्यासाठी वृक्षारोपण हा प्रभावी उपाय आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वानी पुढाकार घेत त्याची सुरवात स्वत: पासून करावी. असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच प्रगतशील शेतकरी संकेत मोरे (रेठरे हरणाक्ष), रघुनाथ खांबे (ईश्वरपूर), प्रदीप नांगरे (हुबालवाडी), संजय थोरात (कालवडे), रामचंद्र काकडे (धोंडेवाडी) या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर दिनानिमित चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार म्हणाले, विद्यार्थी, कर्मचारी, शेतकरी यांच्यात समन्वय करून शेती क्षेत्राची प्रगती केली पाहिजे. पीक उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म नियोजन गरजेचे आहे.
प्राचार्य डॉ. अशोक फरांदे म्हणाले, शेतीचे आरोग्य चांगले ठेवल्यास मानवी आरोग्य अबाधित राहील. कृषी क्षेत्राने सर्वांत जास्त रोजगार देशाला दिला आहे. शेतीमध्ये भरपूर संधी आहेत. नवीन पिढीने शेतीमध्येच नवीन संधी शोधल्या पाहिजेत. प्रा. डॉ. अजित पवार यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. गजानन मोहिते यांनी केले. प्रा.डॉ. सारंग कुंभार यांनी आभार मानले.











































































