Last Updated on 28 Apr 2026 4:07 PM by Sanjay Patil/Adhorekhit
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांचे आवाहन
ईश्वरपूर ।
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग हा वाळवा तालुक्यातील सुपीक जमिनींचा घास घेणारा ठरणार आहे. या विनाशकारी प्रकल्पाला रोखण्यासाठी १ मे महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये प्रत्येक गावाने ‘शक्तिपीठ महामार्ग हटाव, शेतकरी बचाव’ या घोषणेअंतर्गत एकमुखी ठराव करावा,” असे जाहीर आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
हा महामार्ग मसुचीवाडी, बोरगाव, जुनेखेड, नवेखेड, उरूण-ईश्वरपूर, कामेरी, येडेनिपाणी, इटकरे, येलूर, कुरळूप आणि ऐतवडे खुर्द या गावांमधून जाणार आहे. सुमारे २० ते २५ फूट उंचीच्या या रस्त्यामुळे पावसाचे पाणी अडकून जमिनी पाणथळ व क्षारपड होतील, अशी भीती जाधव यांनी व्यक्त केली आहे. याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर आणि पर्यायाने तालुक्यातील पाच साखर कारखान्यांच्या अर्थकारणावर होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत कृष्णा आणि वारणा नद्यांवर मसुचीवाडी, घोगाव आणि ऐतवडे बुद्रुक परिसरात मोठे पूल बांधले जाणार आहेत. या पुलांच्या भरावामुळे नद्यांच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढून २०१९ पेक्षाही भयानक पूरस्थिती निर्माण होऊ शकते. याचा फटका थेट कराड शहरापर्यंत बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या अस्तित्वासाठी आणि सुपीक जमिनी वाचवण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून ग्रामसभांमध्ये शक्तीपीठ विरोधी ठराव करून सरकारला इशारा द्यावा, असे आवाहन भागवत जाधव यांनी केले आहे.












































































