Last Updated on 09 Apr 2026 4:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे ।
कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना औषध कंपन्यांनी बोगस आणि निकृष्ट खते व किटकनाशके दिल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे अशा सर्व औषध कंपन्यावर गुन्हे दाखल करून तातडीने शेतकऱ्यांना चुकीच्या औषध वापराने झालेली नुकसानभरपाई देण्यासंदर्भात कृषी आयुक्तांनी कारवाई करण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत केली.
चालू वर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी व पालघर जिल्ह्यात आंबा व काजू बागायतदार शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटात सापडला आहे. औषध कंपन्यांच्या दरावर राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी ३०० कोटी रूपयाची औषधे खरेदी केली आहेत. औषध कंपन्यांकडून खते , किटकनाशके , पीजीआर व बुरशीनाशकांचा वापर कोणत्या पध्दतीने करण्यात यावा याबाबत माहिती न दिल्याने नुकसान झाले आहे.

आंबा पिकासाठी जवळपास ७० हून अधिक कंपन्यांनी औषधांची विक्री केलेली आहे. सदर कंपन्याच्या औषधांच्या किमतीमध्ये तफावत असून शेतकऱ्यांनी रोखीने औषध खरेदी केल्यास मुळ किमतीच्या ६० ते ६५ टक्के सवलत दिली जाते. गुण नियंत्रण विभागाकडून मोजक्याच कंपन्याच्या औषधांची तपासणी करण्यात येते यामुळे बोगस औषध कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे.
यावेळी बोलताना मा आमदार बाळा माने म्हणाले की, आंबा पिकांच्या किड रोगांच्या औषध फवारणी मध्ये संशोधन विभागाने नेमकं काय संशोधन केले तसेच ज्या औषध कंपन्या बोगस आहेत त्यांच्यावर गुणनियंत्रण विभाग यांनी काय कारवाई केली. १९९० सालापासून गुणनियंत्रण विभाग व कृषी विद्यापीठाकडून फळ बाग लागवडीसाठी नाविन्यपूर्ण कोणतेच संशोधन करण्यात आले नाही.
यावेळी संचालक गुण नियंत्रक सुनिल बोरकर, दापोली कृषी विद्यापीठाचे संशोधक अनिल देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, गणेश गायकर, सुशांत नाईक, प्रशांत शिंदे, प्रकाश बालवडकर, अजय तेली, उमेश वाळके तिमीर माणगांवकर, सुजीत चौकेकर, दिपक कदम, विनय पाडावे, औषध कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी उपस्थित होते.










































































