Last Updated on 05 Apr 2026 4:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
१३ एप्रिलपूर्वी हरकती दाखल करणे आवश्यक
सांगली ।
ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडील दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ च्या आदेशान्वये माहे जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कार्यक्रम निश्चित करून दिलेला आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील १० तालुक्यामधील १५२ ग्रामपंचायतींची प्रारुप प्रभाग रचना (नमुना-ब) मंगळवार, दि. ७ एप्रिल २०२६ रोजी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि पंचायत समितीच्या नोटीस बोर्डवर नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) सतिश कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर कोणाला काही हरकती किंवा सूचना असल्यास, त्यांनी त्या संबंधित तहसीलदार यांच्याकडे दिनांक १३ एप्रिल २०२६ पूर्वी लेखी स्वरूपात दाखल करणे आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या हरकतीवर आवश्यकता भासल्यास, संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्यास्तरावर दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी सुनावणी घेण्यात येईल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.










































































