न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघ घोषित
केएल राहुलची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली
व्यंकटेश अय्यर, ऋतुराज गायकवाड, हर्षल पटेल यांसारख्या युवा खेळाडूंचा टीम इंडियात समावेश
मुंबई ।
टी-20 विश्वचषकानंतर लगेचच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे 17 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर आता रोहित टी-२० मध्ये संघाची कमान सांभाळणार आहे.केएल राहुलची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
न्यूझीलंडविरुद्धची टी२० मालिका १७ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. पहिला सामना जयपूरला होणार आहे. त्यानंतर १९ आणि २१ नोव्हेंबर रोजी अनुक्रमे रांची आणि कोलकाता येथे दुसरा आणि तिसरा टी२० सामना होणार आहे.
या टी२० मालिकेसाठी भारताच्या काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर अशा काही खेळाडूंचा समावेश आहे.
त्यामुळे अनेक युवा खेळाडूंना टी२० मालिकेसाठी भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. यात ऋतुराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, आवेश खान अशा खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंनी आयपीएल २०२१ बरोबरच सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळताना देखील प्रभावित केले आहे.
त्याचबरोबर युजवेंद्र चहलचे भारताच्या टी२० संघात पुनरागमन झाले असून आर अश्विन आणि भुवनेश्वर कुमार संघात स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत.
टी-20 मालिकेसाठी इंडियाची टीम
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड,श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव,ऋषभ पंत (यष्टीरक्षक) ,इशान किशन (यष्टीरक्षक),व्यंकटेश अय्यर,युझवेंद्र चहल,रविचंद्रन अश्विन,अक्षर पटेल,आवेश खान,भुवनेश्वर कुमार, दीपक चहर,हर्षल पटेल, मोहम्मद सिराज यांचा या टीममध्ये समावेश आहे.
भारत-न्यूझीलंड मालिकेचे वेळापत्रक
• 17 नोव्हेंबर – पहिला T20 (जयपूर)
• 19 नोव्हेंबर – 2रा T20 (रांची)
• 21 नोव्हेंबर – 3रा T20 (कोलकाता)
• पहिली कसोटी- 25-29 नोव्हेंबर (कानपूर)
• दुसरी कसोटी – 3-7 डिसेंबर (मुंबई)