Last Updated on 25 Mar 2026 6:58 AM by Sanjay Patil/Adhorekhit
LPG Gas Crisis : मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावाचे पडसाद भारतातही उमटत आहेत. सध्या, देशाच्या बहुतांश भागांमध्ये एलपीजी पुरवठ्याबाबत चिंतेचे वातावरण आहे. सध्या देशात इंधन आणि गॅस टंचाईची चर्चा जोरात सुरू आहे. अनेक ठिकाणी गॅस मिळवण्यासाठी रांगा लागत आहेत. मात्र, कसाबसा गॅस सिलेंडर मिळाल्यानंतर आपण आनंदाच्या भरात एक मोठी चूक करतोय का? घाईघाईत मिळालेला तो सिलेंडर तुमच्या कुटुंबासाठी ‘टाईम बॉम्ब’ तर ठरणार नाही ना? सिलेंडरच्या लोखंडी पट्टीवर लपलेला एक ‘गुपित कोड’ तुमच्या सुरक्षेशी थेट संबंधित आहे, ज्याकडे ९० टक्के नागरिक दुर्लक्ष करतात.
स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे गॅस सिलेंडर. आपण गॅस संपला की नवीन सिलेंडर घेतो, पण कधी आपण त्याची ‘एक्सपायरी डेट’ (Expiry Date) तपासली आहे का? अन्नाप्रमाणेच गॅस सिलेंडरलाही एक ठराविक मुदत असते. ही मुदत संपलेला सिलेंडर वापरणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. गॅस सिलेंडरची एक्सपायरी कशी तपासायची, याची सोपी पद्धत प्रत्येक नागरिकाने जाणून घेणे गरजेचे आहे.
काय आहे ‘त्या’ कोडचे रहस्य?
गॅस सिलेंडरच्या वरच्या बाजूला असलेल्या तीन लोखंडी पट्ट्यांपैकी एका पट्टीवर ‘A-26’ किंवा ‘B-27’ अशा स्वरूपाचा एक कोड कोरलेला असतो. हा केवळ कंपनीचा नंबर नसून, तो सिलेंडरची ‘एक्सपायरी डेट’ (Expiry Date) सांगणारा इशारा आहे. टंचाईच्या काळात जुने किंवा मुदत संपलेले सिलेंडर बाजारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणूनच हा कोड समजून घेणे आता अधिक गरजेचे झाले आहे.
असा उलगडा करा या कोडचा:
हा कोड तुमच्या सिलेंडरची ‘रि-टेस्टिंग’ किंवा मुदत संपण्याची तारीख सांगतो:
A (जानेवारी ते मार्च) : जर कोड ‘A-26’ असेल, तर मार्च २०२६ नंतर हा सिलेंडर वापरणे धोक्याचे आहे.
B (एप्रिल ते जून) : एप्रिल ते जून या कालावधीसाठी.
C (जुलै ते सप्टेंबर) : जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी.
D (ऑक्टोबर ते डिसेंबर) : वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांसाठी.
अंकांचा अर्थ : अक्षराच्या पुढे असलेले दोन अंक (उदा. 26) हे वर्ष दर्शवतात.
टंचाईच्या काळात ‘हे’ धोके टाळा
इंधन टंचाईमुळे आपण कोणताही सिलेंडर स्वीकारतो, पण मुदत संपलेला सिलेंडर गॅसचा प्रचंड दाब सहन करू शकत नाही. यामुळे गळती होणे किंवा सिल बंद असतानाही स्फोट होण्याचा धोका असतो. त्यामुळे ‘डिलिव्हरी’ घेताना कितीही घाई असली, तरी हा कोड तपासूनच सिलेंडर पदरात पाडून घ्या.
महत्त्वाची नोंद : ‘अधोरेखित’ न्यूज पोर्टल वस्तुनिष्ठ आणि सत्य बातम्या देण्यासाठी कटिबद्ध आहे. तरीही, अनावधानाने एखाद्या बातमीत त्रुटी किंवा चुकीची माहिती आढळल्यास, कृपया आम्हाला संबंधित लिंकसह इन्बॉक्समध्ये कळवावे. आम्ही तथ्यांची पडताळणी करून योग्य ती सुधारणा त्वरित करू. – संपादक, अधोरेखित










































































