Last Updated on 16 Mar 2026 10:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे ।
ग्रामीण भागातील अर्थकारणाला गती देण्यासाठी आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयं-सहाय्यता बचत गटांना स्वावलंबी बनवण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला आहे. या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विशेष योजनेअंतर्गत आता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदीवर तब्बल ९० टक्के अनुदान दिले जाणार आहे.
काय आहे मिनी ट्रॅक्टर योजना?
शेतीची कामे वेगाने आणि सुलभतेने व्हावीत, या उद्देशाने ९ ते १८ अश्वशक्ती (HP) क्षमतेचा मिनी ट्रॅक्टर या योजनेंतर्गत दिला जातो. केवळ ट्रॅक्टरच नाही, तर त्यासोबत शेतीसाठी आवश्यक असणारे कल्टीव्हेटर आणि ट्रेलर (ट्रॉली) सुद्धा पुरवली जाते. यामुळे बचत गटांना स्वतःची शेती करण्यासोबतच हा ट्रॅक्टर भाड्याने देऊन उत्पन्न वाढवण्याचीही मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
अनुदानाचे स्वरूप :
या योजनेचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे मिळणारे अनुदान. मिनी ट्रॅक्टरच्या एकूण किमतीच्या ९० टक्के अनुदान (कमाल ३.१५ लाख रुपयांपर्यंत) शासनाकडून दिले जाते. उर्वरित अल्प रक्कम बचत गटाला उभी करावी लागते. यामुळे अत्यंत कमी खर्चात बचत गट या आधुनिक साधनसामग्रीचे मालक होऊ शकतात.
कुठे करायचा अर्ज?
इच्छुक बचत गटांनी अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी ‘सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे’ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.












































































