Last Updated on 16 Mar 2026 12:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कराड ।
सहकाराची पंढरी मानल्या जाणाऱ्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीत आता एक नवे आणि लक्षवेधी राजकीय समीकरण समोर आले आहे. संस्थापक पॅनेलने माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या पत्नी अर्चना मोहिते यांचे नाव नेतृत्वासाठी पुढे करत निवडणुकीत एक मोठा राजकीय संदेश दिला आहे. अविनाश मोहिते यांच्या बरोबरीने त्या प्रचारात उतरणार आहेत. राजकीय निरीक्षकांच्या मते, या निवडणुकीत अर्चना मोहिते हा एक असा ‘फॅक्टर’ ठरणार आहे, जो सहानुभूती आणि सकारात्मकता निर्माण करणारा ठरण्याची शक्यता आहे.
सौ. अर्चना मोहिते यांना मोठा राजकीय वारसा लाभला आहे. त्या ‘कृष्णे’चे संस्थापक स्व. आबासाहेब मोहिते यांच्या नातसून असून सातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती देवराज पाटील यांच्या भगिनी आहेत. माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे त्यांचे चुलत मामा आहेत, तर कोल्हापूरचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या त्या मावशी आहेत. या तगड्या राजकीय पार्श्वभूमीसह त्यांनी आता थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक प्रचारात अविनाश मोहिते यांच्या बरोबरीने त्या नेतृत्व करणार आहेत. एका महिला नेतृत्वाच्या हाती संस्थापक पॅनेलच्या निवडणुकीची सूत्रे जाणार असल्याने आता प्रचाराची आणि रणनीतीची दिशा कशी असेल, याकडे संपूर्ण कार्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे.
कृष्णा कारखान्याच्या इतिहासात नेतृत्वाच्या पातळीवर महिला चेहरा समोर येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सभासदांमध्ये मोठी उत्सुकता आहे. संस्थापक पॅनेलकडून ‘नवीन चेहरा आणि नवे नेतृत्व’ असा संदेश देण्याचा प्रयत्न होत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. कारखान्याच्या राजकारणात दीर्घकाळापासून प्रस्थापित असलेल्या नेतृत्वाला पर्याय म्हणून हा प्रयोग राबवला जात असून, यामुळे सभासदांमध्ये सहानुभूती आणि सकारात्मकता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा – कृष्णा कारखाना निवडणूक : मतदारयादीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार?…
निवडणुकीच्या समीकरणांवर परिणाम?
हा निर्णय निवडणुकीच्या निकालावर किती प्रभाव टाकू शकतो, याबाबत सध्या कृष्णाकाठी मोठी चर्चा आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, या नवीन नेतृत्वामुळे तटस्थ किंवा नाराज मतदारांचे लक्ष संस्थापक पॅनेलकडे वळू शकते. दुसरीकडे, सत्ताधारी गटाकडून याकडे केवळ ‘राजकीय रणनीती’ म्हणून पाहिले जात असून, प्रत्यक्ष कारखाना व्यवस्थापन आणि अनुभवाच्या मुद्द्यावरून याला उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.
सभासदांचा अंतिम कौल महत्त्वाचा
कृष्णा कारखान्याचा ३६ वर्षांचा संघर्षाचा इतिहास पाहिला तर येथे सभासदांनी अनेकदा अनपेक्षित कौल देत सत्तांतर घडवून आणले आहे. अर्चना मोहिते यांच्या नेतृत्वाची घोषणा हा निवडणुकीतील चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असला तरी, अंतिम निर्णय हा कृष्णाकाठच्या सुज्ञ सभासदांच्या हातातच राहणार आहे.












































































