Last Updated on 14 Mar 2026 4:43 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी GAPLM आणि GMR Airport Limited यांच्यात सामंजस्य करार
जागतिक बाजारपेठेत पोहचणार गोव्याची उत्पादने
पणजी ।
गोवा कृषी उत्पादन व पशुधन विपणन मंडळ (GAPLM) आणि GMR Airport Limited यांच्यात मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कृषी निर्यात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी पणजी येथील महालक्ष्मी येथे सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. हा करार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत औपचारिक करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश गोव्यातील शेतकऱ्यांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि स्थानिक कृषी उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे हा आहे.
या भागीदारीअंतर्गत विमानतळावर आधुनिक पॅक हाऊस आणि कृषी-लॉजिस्टिक्स सुविधा उभारण्यात येणार असून, त्यामध्ये कृषी उत्पादनांचे वर्गीकरण (ग्रेडिंग), पॅकेजिंग आणि निर्यात प्रक्रिया कृषी व प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) यांच्या मानकांनुसार केली जाईल. या सुविधेमुळे कापणीनंतर होणारे नुकसान कमी होण्यास मदत होईल तसेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण होतील.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “हा उपक्रम गोव्याच्या कृषी निर्यात व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना अधिक व्यापक बाजारपेठांपर्यंत पोहोचता येईल, उत्पादनांची गुणवत्ता आणि हाताळणी सुधारेल तसेच ‘स्वयंपूर्ण गोवा’ या संकल्पनेअंतर्गत कृषी मूल्यसाखळी अधिक मजबूत होईल.”
या कार्यक्रमाला गोवा कृषी उत्पादन व पशुधन विपणन मंडळाचे अध्यक्ष श्री. संदीप फळदेसाई, GAPLM मंडळाचे प्रशासक श्री. गुरुनाथ सगुण नाईक, GAPLM मंडळाचे सचिव श्री. कीर्तिराज के. नाईक गावकर, तसेच GMR Airport Limited, मोपा यांचे अध्यक्ष, यांच्यासह कृषी विभाग व संबंधित संस्थांचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.










































































