Last Updated on 13 Mar 2026 3:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
ईश्वरपूर पोलीसांच्यावरचा कामाचा वाढता ताण, लोकसंख्येचा वाढता विस्तार व गुन्हयांचे प्रमाण लक्षात घेवून ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे विभाजन करून भवानीनगर येथे नवीन पोलीस ठाणे करण्याच्या प्रस्तावाला काहींचा विरोध असल्याने हा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला होता. पण, त्याला पर्याय म्हणून सांगली, कराडच्या धर्तीवर ईश्वरपूर शहर व ईश्वरपूर ग्रामीण अशी दोन पोलीस ठाणी निर्माण करण्याची गरज आहे. यामुळे ईश्वरपूर पोलीसांवरील कामाचा वाढता ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण ४१ गावे असुन सदर हद्दीमध्ये पेठ व भवानीनगर अशी दोन दुरक्षेत्र व ताकारी गावामध्ये पोलीस चौकी आहे. तसेच इतर बिट अंतर्गत कामकाज करण्यात येते. राष्ट्रीय महामार्ग हा पेठ ते कामेरी असा सुमारे १२ किलो मीटरचा मार्ग ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जात आहे.त्यामुळे अपघाताचे प्रमाण अधिक आहे. तसेच ईश्वरपूर, पेठ, बोरगांव, कामेरी, ताकारी, रेठरे हरणाक्ष ही गावे राजकीयदृष्ट्या संवेदनशिल आहेत.
त्याचबरोबर ईश्वरपूर शहराची सुमारे १ लाखाच्या आसपास संमिश्र लोकसंख्या आहे. ईश्वरपूर शहरामध्ये २० मंदिरे, २ चर्च व १७ मस्जिद आहेत. ईश्वरपूर शहराला लागुनच राजारामनगर येथे राजारामबापु सहकारी साखर कारखाना आहे. औदयोगिक वसाहतीमध्ये लहान मोठ्या उदयोगांची संख्या जास्त आहे. ईश्वरपूर शहरामध्ये विविध शैक्षणिक संकुले आहेत. परदेशातून,परराज्यातून विदयार्थी शिक्षणासाठी येतात, त्याचबरोबर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, इंजिनीअरींग, वैदयकीय महाविदयालये, स्पर्धा परिक्षा केंद्र तसेच इतर शैक्षणिक दृष्टया सर्व शिक्षणाच्या सोई सुविधा उपलब्ध असल्याने तालुक्यातील व इतर जिल्हयातील विदयार्थ्यांचे शिक्षणासाठी येणे जाण्याचे प्रमाण जास्त आहे. ईश्वरपूर शहरामध्ये अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, प्रथमवर्ग न्यायालय, उपविभागीय अधिकारी व इतर शासकीय कार्यालये असून त्यामुळे नागरिकांचे येणे जाणेचे प्रमाणात दैनंदिन वाढ होत आहे.
गुन्हयांचे प्रमाण तुलनात्मकदृष्टया अधिक असुन इतर सण उत्सव, मोर्चा, इतर बंदोबस्तामुळे पोलीसांच्यावर कामाचा ताण अधिक आहे. ईश्वरपूर शहराचा विकास झपाटयाने होत असुन गुन्हयांच्या प्रमाणात ही नियमितपणे वाढ होत आहे. त्यातच पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी यामुळे पोलिसांच्यावर कामाचा ताण वाढत आहे. या सर्व बाबींचा विचार करून तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी सन २०२० मध्ये स्वतंत्र भवानीनगर पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. भवानीनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत २० गावांचा समावेश अपेक्षित होता. भवानीनगर पोलीस ठाण्यासाठी भवानीनगर ग्रामपंचायतीने जागाही देऊ केली होती.
प्रस्थावित भवानीनगर पोलीस ठाण्याअंतर्गत गावे अशी :
भवानीनगर, किल्ले मछिंद्रगड, येडेमछिंद्र, ताकारी, बहे, रेठरेहरणाक्ष, नरसिंहपुर, मसुचीवाडी, हुबालवाडी, शिरटे, दुधारी, बेरडमाची, बिचूद, खरातवाडी, लवंडमाची, गौंडवाडी, फार्णेवाडी, कोळे, बनेवाडी, साटपेवाडी
पण, या प्रस्तावाला काही गावातील राजकीय पदाधिकाऱ्यांचा होता, त्यामुळे हा प्रस्ताव सध्यातरी ‘पेंडिंग’ असल्याचे समजते. तरीही ईश्वरपूर पोलीसांच्यावरचा कामाचा वाढता ताण, लोकसंख्येचा वाढता विस्तार व गुन्हयांचे प्रमाण त्यातच पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी हे लक्षात घेवून ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे विभाजन होणे तितकेच महत्वाचे आहे. भवानीनगरच्या प्रस्तावाला पर्याय म्हणून सांगली, कराडच्या धर्तीवर ईश्वरपूर शहर व ईश्वरपूर ग्रामीण अशी दोन पोलीस ठाणी निर्माण करण्याची गरज आहे. यामुळे ईश्वरपूर पोलीसांवरील कामाचा वाढता ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून भवानीनगर अथवा ईश्वरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यासाठी पाठपुरावा केल्यास हा प्रश्नही मार्गी लागू शकतो.
ईश्वरपूर पोलीस ठाण्यात समाविष्ट असलेली गावे अशी :
ईश्वरपूर, भवानीनगर, किल्ले मछिंद्रगड, येडेमछिंद्र, ताकारी, बहे, रेठरेहरणाक्ष, नरसिंहपुर, मसुचीवाडी, हुबालवाडी, शिरटे, दुधारी, बेरडमाची, बिचूद, खरातवाडी, लवंडमाची, गौंडवाडी, फार्णेवाडी, कोळे, बनेवाडी, साटपेवाडी, जुनेखेड, बोरगाव, घबकवाडी, सुरूल, ओझर्डे, रेठरेधरण, मरळनाथपूर, माणिकवाडी, महादेववाडी, पेठ, नायकलवाडी, कापूसखेड, साखराळे, नवेखेड, तुजारपूर, जांभूळवाडी, वाघवाडी, विठ्ठलवाडी, शिवपुरी, कामेरी.










































































