Last Updated on 05 Mar 2026 9:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने सर्वसामान्यांचे प्रश्न स्थानिक स्तरावर सोडवण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ टप्पा क्रमांक १ चे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत वाळवा तालुक्यातील बहे येथे शनिवारी, ७ मार्च रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या शिबिराद्वारे महसूल विभागाच्या विविध सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचवल्या जाणार आहेत.
सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत आणि त्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सुटावेत, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. बहे येथील शिबिरामध्ये महसूल, कृषी, आरोग्य, वन विभाग आणि भूमी अभिलेख यांसारख्या विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हेही वाचा – वाळवा तालुक्यात महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन; पाहा संपूर्ण वेळापत्रक
या सेवांचा मिळणार लाभ
या शिबिरात प्रामुख्याने सातबारा संगणकीकरणातील त्रुटी दूर करणे, प्रलंबित फेरफार निकाली काढणे आणि भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन-क्रिमिलीयर आणि अधिवास प्रमाणपत्रे (डोमासाईल) यांचे जागेवरच अर्ज स्वीकारून कार्यवाही केली जाईल. याव्यतिरिक्त पी.एम. किसान योजना, पांदण रस्ते आणि विविध सामाजिक अर्थसहाय्य योजनांबाबतचे प्रश्नही मार्गी लावले जाणार आहेत.
उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन आणि तहसीलदार सारिका रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली बहे येथील रामलिंग मंगल कार्यालय येथे होत असलेल्या या शिबिराचा बहे आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळ अधिकारी उषा गवळे व ग्राम महसूल अधिकारी गणेश हुबाले यांनी केले आहे.
खात्रीशीर बातम्यांसाठी आमचे व्हॉट्सॲप चॅनेल फॉलो करा:
https://whatsapp.com/channel/0029Va5qiey1yT21NvR3Ea3S








































































