Last Updated on 04 Mar 2026 3:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ।
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने सर्वसामान्यांचे प्रश्न स्थानिक स्तरावर सोडवण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ टप्पा क्रमांक १ चे आयोजन वाळवा तालुक्यात करण्यात आले आहे. मार्च ते मे २०२६ या कालावधीत तालुक्यातील विविध मंडळ मुख्यालयांच्या ठिकाणी ही शिबिरे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडणार असून, याद्वारे महसूल विभागाच्या विविध सेवा थेट जनतेच्या दारी पोहोचवल्या जाणार आहेत.
या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे वेळापत्रक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार ७ मार्च रोजी बहे येथे पहिल्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर १४ मार्च रोजी तांदुळवाडी, १० एप्रिल रोजी चिकुर्डे, १७ एप्रिल रोजी पेठ, ८ मे रोजी ताकारी आणि १५ मे रोजी ईश्वरपूर येथे समारोप शिबीर संपन्न होईल. या शिबिरांच्या माध्यमातून महसूल, कृषी, आरोग्य, वन विभाग आणि भूमी अभिलेख यांसारख्या विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
प्रामुख्याने सातबारा संगणकीकरणातील त्रुटी दूर करणे, प्रलंबित फेरफार निकाली काढणे आणि भोगवटादार वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेला या शिबिरात गती दिली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन-क्रिमिलीयर आणि अधिवास प्रमाणपत्रे (डोमासाईल) यांचे जागेवरच अर्ज स्वीकारून त्यांचे वाटप केले जाईल. याव्यतिरिक्त पी.एम. किसान योजना, पांदण रस्ते आणि विविध सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभार्थ्यांचे प्रश्नही मार्गी लावले जाणार आहेत.
सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत आणि त्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सुटावेत, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. या सुवर्णसंधीचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन आणि तहसीलदार सारिका रासकर यांनी केले आहे.










































































