Last Updated on 27 Feb 2026 7:38 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राजू शेट्टी आणि डॉ. भारत पाटणकरांचा सरकारला इशारा
ईश्वरपुरात तहसीलदार कचेरीवर शक्तीपीठ विरोधात मोर्चा
ईश्वरपूर/विनोद मोहिते
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी रणशिंग फुंकले.प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांची एक इंचही जमीन देणार नाही” असा ठाम निर्धार आज शुक्रवारी येथे तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चात करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर, माजी खा.राजू शेट्टी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी कॉ. धनाजी गुरव, बी. जी. पाटील यांच्या सह विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांची व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले, “मागणी नसताना शेतकऱ्यांवर लादला जाणारा हा महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांना दिलेला सरळ त्रास आहे. वाळवा तालुक्यातील १२ गावांतून जाणाऱ्या या महामार्गासाठी शेकडो एकर सुपीक जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. ही जमीन उस, सोयाबीन, भात, गहू, भुईमूग यांसारखी हमखास उत्पादन देणारी आहे. या शेतीमुळेच या गावांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. ही शेती गिळंकृत करण्याचा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही. मतांना पाच ते दहा हजारांचा दर देऊन सत्ता मिळविण्यासाठी हा महामार्गाचा धंदा सुरू आहे. एक लाख पाच हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या प्रकल्पामुळे भविष्यात टोलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेवर हजारो कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना उभारण्यात येणाऱ्या कंपाऊंडमुळे लगतच्या जमिनींच्या किमती वाढणार नसून उलट नुकसान होणार आहे.”
आंदोलन स्थळी डॉ.भारत पाटणकर म्हणाले, “संघटित विरोध उभा करून हा महामार्ग रद्द होईपर्यंत आपण गप्प बसणार नाही. सुपीक शेती उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प शेतकरी कदापि सहन करणार नाही.”
कॉ. धनाजी गुरव यांनी सरकारला खडा सवाल करत म्हणाले, “ज्या महामार्गाचा आम्हाला काहीही उपयोग नाही, तो आमच्यावर सक्तीने का लादला जात आहे? महामार्गामुळे उरलेल्या जमिनीवर पाणी साचेल, क्षारपड निर्माण होईल आणि शेती कायमची नापीक बनेल. ही भयावह परिस्थिती रोखण्यासाठी आम्ही तीव्र संघर्ष करू.”
बी. जी. पाटील म्हणाले, “या १२ गावांना कृष्णा व वारणा नद्यांचा काठ लाभलेला आहे. या नद्यांमुळे शेती समृद्ध झाली. मात्र महामार्गाचे उंच भराव झाल्यास पाणी तुंबून वारंवार महापूर येईल व संपूर्ण जनजीवन उद्ध्वस्त होईल.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय बापू पाटील म्हणाले, “लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या प्रयत्नातून सिंचन झालेली ही सुपीक जमीन महामार्गाच्या घशात घालू देणार नाही. एक इंच जमीनही देणार नाही.”
शहाजी पाटील म्हणाले, “जबरदस्ती केल्यास तीव्र आंदोलन उभारू.”
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित पाटील (उबाठा), सुश्मिता जाधव, ज्योत्सना पाटील,दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शंकर महापूरे, कॉम्रेड दिग्विजय पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, शैलेश पाटील, गिरीश फोंडे यांची भाषणे झाली. सर्वांनी आक्रमक भूमिका घेत महामार्गास तीव्र विरोध दर्शविला.
मोर्चाचे नियोजन प्रा. सुहास पाटील, दीपक कोठावळे, उमेश कुरळपकर, भागवत जाधव, अजित हवालदार, प्रवीण पाटील, रणजीत चव्हाण, विजय महाडिक व सर्व सहकाऱ्यांनी केले.
पंचायत समिती, ईश्वरपूर येथे क्रांतिसिंह नाना पाटील व लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून मोर्चास सुरुवात झाली. भर उन्हात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला व तेथे सभेत रूपांतर झाले.












































































