Last Updated on 20 Feb 2026 9:07 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे ।
आजच्या अनिश्चित आर्थिक वातावरणात सर्वसामान्य माणूस आपल्या घाम गाळून कमावलेल्या पैशातील रुपया-रुपया वाचवून बँक, पतसंस्था किंवा क्रेडिट सोसायटीत विश्वासाने ठेवतो. मात्र, अनेकदा केवळ जास्त व्याजाच्या आमिषाला बळी पडून आपण वर्षानुवर्षांची कमाई धोक्यात घालतो. कोणत्याही बँकेत किंवा पतसंस्थेत मुदत ठेव (FD) ठेवण्यापूर्वी केवळ व्याजाचा दर न पाहता, त्या संस्थेची आर्थिक कुंडली आणि अंतर्गत कारभार तपासणे आता अनिवार्य झाले आहे. विशेषतः नागरी पतसंस्था आणि क्रेडिट सोसायट्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी व्याजाच्या आमिषामुळे सामान्य ठेवीदारांची गुंतवणूक जोखमीच्या वळणावर असल्याची भीती आर्थिक तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या अनेक बँका आणि नागरी पतसंस्था, क्रेडिट सोसायटीत ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी ९ ते १२ टक्क्यांपर्यंत व्याजाचे आमिष दाखवतात. मात्र, अशा ठिकाणी पैसे ठेवताना दहा वेळा विचार करा. ज्या संस्था अवाजवी व्याज देतात, त्यांच्या गुंतवणुकीचा धोकाही तितकाच जास्त असू शकतो. मुद्दलाच्या सुरक्षिततेपेक्षा व्याजाला महत्त्व देणे भविष्यात महागात पडू शकते.
काही बँका,पतसंस्था किंवा क्रेडिट सोसायट्या डबघाईला येण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे तिथला अंधाधुंद आणि नियमबाह्य कर्जपुरवठा. अनेक संस्थांमध्ये संस्थापक, संचालक आणि बड्या अधिकाऱ्यांचे जवळचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांना नियम धाब्यावर बसवून भरमसाठ कर्जे दिली जातात. या कर्जांसाठी पुरेशी सुरक्षा (Collateral) घेतली जात नाही. कर्जदार संबंधित असल्याने कर्जवसुलीसाठी कोणतीही कडक पावले उचलली जात नाहीत आणि पर्यायाने ही कर्जे नंतर ‘बुडीत’ निघतात.सहकारी बँकिंग क्षेत्र डबघाईला येण्यामागे ‘नियमबाह्य कर्जवाटप’ हे सर्वात मोठे कारण असल्याचे विविध ऑडिट रिपोर्टमधून समोर आले आहे.
गुंतवणुकीपूर्वी या ४ गोष्टी नक्की तपासा:
१. बँकेचा NPA किती आहे? :
NPA (Non-Performing Asset) म्हणजे बँकेने दिलेली अशी कर्जे जी परत आलेली नाहीत. ज्या बँकेचा NPA जास्त असतो, ती बँक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असते. त्यामुळे ठेवी ठेवण्यापूर्वी बँकेचा नेट NPA नक्की तपासा.
२. कर्जवाटप कोणाला आणि कसे? :
बँकेने कोणाला कर्ज दिले आहे? कर्जवाटप सुरक्षित क्षेत्रांत आहे की केवळ संचालकांच्या जवळच्या व्यक्तींना? हे पाहणे महत्त्वाचे आहे. हितसंबंधांना प्राधान्य देऊन दिलेली कर्जे अनेकदा बुडण्याची शक्यता असते, ज्याचा थेट फटका सामान्य ठेवीदारांना बसतो.
३. कर्जवसुलीची क्षमता :
बँकेची कर्जवसुली (Recovery) किती स्ट्रॉंग आहे, यावर त्या बँकेचे भविष्य अवलंबून असते. ज्या संस्थांची वसुली प्रक्रिया कडक आणि पारदर्शक असते, तिथेच ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहतात.
४. संस्थेचा इतिहास तपासा :
गुंतवणूक करण्यापूर्वी त्या संस्थेचा मागील किमान १० वर्षांचा इतिहास, त्यांचा ऑडिट वर्ग आणि बाजारातील विश्वासार्हता तपासा.
तुमचा पैसा कष्टाचा आहे, तो कुठेही ठेवताना ‘इमोशनल’ न होता ‘प्रोफेशनल’ विचार करा. बुडालेली संस्था केवळ संचालकांचे नुकसान करत नाही, तर तुमच्या सारख्या हजारो ठेवीदारांचे आयुष्य उद्ध्वस्त करते. त्यामुळे सुरक्षित पर्याय निवडा आणि कष्टाची कमाई सुरक्षित ठेवा. अखेर, कष्टाची कमाई गुंतवताना केवळ भावनिक न होता, तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची पूर्तता तपासणे हाच आर्थिक सुरक्षिततेचा मार्ग असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.









































































