Last Updated on 19 Feb 2026 5:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
दैनंदिन १ ते १.५ कोटी रुपयांची तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली असलेल्या एसटी महामंडळाला नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि गाड्यांची कमतरता लक्षात घेता, यंदा तब्बल ८,३०० नवीन बसेस एसटीच्या ताफ्यात सामील केल्या जाणार आहेत. “बसेस वाढल्या तर प्रवासी वाढतील आणि प्रवासी वाढले तर उत्पन्न आपोआप वाढेल,” असा विश्वास परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
कोरोनानंतरची घसरण आणि आता भरारीची तयारी
कोरोना महामारीपूर्वी एसटीकडे १८ ते १९ हजार बसेस होत्या आणि दररोज सुमारे ६६ लाख प्रवासी ‘लालपरी’ने प्रवास करत होते. मात्र, महामारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या चार-पाच वर्षांत नवीन बसखरेदी रखडली. परिणामी, २०२४ अखेरपर्यंत बसेसची संख्या घटून १२,६०० वर आली. दुसरीकडे, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास दिल्याने प्रवाशांचा ओघ वाढला, सध्या दररोज सुमारे ५० लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात, मात्र अनेक मार्गावर फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत. हाच अडथळा दूर करण्यासाठी आता ८,३०० बसेसचा भव्य आराखडा तयार करण्यात आला आहे.
असा असेल नवा ताफा : ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचे आकर्षण
३,००० ‘३×२’ आसन रचनेच्या ५१ आसनी बसेस मार्चपासून टप्प्याटप्प्याने आगमन या बसेसना राजमाता जिजाऊ साहेब’ यांचे नाव देण्यात आले. एसटीच्या ताफ्यात येणाऱ्या ८,३०० बसेसचे नियोजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे:
३,००० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस : मार्चपासून टप्प्याटप्प्याने ५१ आसनी या बसेस दोन शहरांदरम्यानच्या गर्दीच्या मार्गावर धावतील.
५,००० साध्या बसेस : सर्वसामान्यांसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच या गाड्या सेवेत येतील.
१०० मिडी बसेस : दुर्गम आणि आदिवासी भागांतील प्रवाशांची सोय करण्यासाठी या लहान बसेस वापरल्या जातील.
२०० अत्याधुनिक बसेस : खाजगी वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी हायटेक बसेसचा समावेश असेल.
नफा नाही, तर ‘जीवनवाहिनी’ टिकवण्याचा निर्धार
सध्या एसटीचा दैनंदिन खर्च ३४ ते ३५ कोटी रुपये असून उत्पन्न ३३ कोटींच्या घरात आहे. दररोजची १ ते १.५ कोटींची तूट भरून काढण्यासाठी खर्च-उत्पन्नाचा समतोल साधणे आवश्यक आहे. यावर बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, “एसटी हा नफा कमावणारा उद्योग नाही, तर ती राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. नवीन बसेस आल्यावर उत्पन्न निश्चित वाढेल आणि या वर्षाअखेर एसटी आर्थिक गर्तेतून बाहेर येईल.”
ग्रामीण भागातील मुक्कामी फेऱ्या, आदिवासी पाड्यांपर्यंत सेवा, दोन शहरादरम्यान गर्दीच्या मार्गावर अतिरिक्त गाड्या या सर्वांमुळे एसटीची पकड पुन्हा मजबूत होणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता नव्या जोमाने, नव्या ताफ्यासह आणि नव्या आर्थिक बळावर पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत आहे.









































































