Last Updated on 18 Feb 2026 11:00 PM by Sanjay Patil/Adhorekhit
तारीख ११ जुलै १९७९. वेळ रात्रीची. संपूर्ण भारतात एक भयाण शांतता पसरली होती. लोक घराच्या खिडक्या-दरवाजे लावून आत बसले होते. रस्त्यावर शुकशुकाट होता, पण प्रत्येकाच्या नजरा अधूनमधून काळोख्या आकाशाकडे वळत होत्या. प्रत्येकाच्या मनात एकच भीती होती. ‘ते’ नेमका कुठे पडणार? ‘ते’ म्हणजे नासाचे ७७ टन वजनाचे भव्य अंतराळ स्थानक ‘स्कायलॅब’.
काय होतं हे स्कायलॅब?
१९७३ मध्ये अमेरिकेने अंतराळात सोडलेले हे मानवी वस्तीचे पहिले मोठे स्टेशन होते. सुमारे ९ मजली इमारतीएवढे प्रचंड आणि वजन तब्बल ७७,००० किलो! पण १९७९ मध्ये सूर्यावरील वादळांमुळे हे स्टेशन नियंत्रणाबाहेर गेले आणि वेगाने पृथ्वीच्या दिशेने झेपावू लागले. वैज्ञानिकांचा इशारा होता. हा ७७ टनी लोखंडी गोळा कोणत्याही शहरावर कोसळू शकतो आणि क्षणात राख करू शकतो!
भारतावर आलेलं मृत्यूचं सावट
त्यावेळच्या जागतिक नकाशावर भारताचे नाव ‘धोकादायक क्षेत्र’ म्हणून दिसत होते. अफवांचा बाजार इतका गरम होता की, काही लोक म्हणत होते की हे महाराष्ट्रावरच पडणार! गुजरातमधील एका गावात तर लोकांनी चक्क हेलमेट घालून फिरण्यास सुरुवात केली होती. काही ठिकाणी लोकांनी “स्कायलॅब पडू नये” म्हणून चक्क देवाला साकडे घातले. वर्तमानपत्रात रोज एकाच हेडलाईन असायच्या. “आज स्कायलॅब येणार का?”
तो अंतिम क्षण आणि सस्पेन्सचा अंत
११ जुलैच्या मध्यरात्री ‘स्कायलॅब’ने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. आकाशात आगीचा एक प्रचंड गोळा वेगाने फिरताना दिसला. घर्षणामुळे त्याचे हजारो तुकडे झाले आणि ते आगीच्या गोळ्यासारखे खाली पडू लागले. क्षणभर वाटले की आता भारताचे काही खैर नाही… पण निसर्गाला काही वेगळेच मान्य होते.
भारताच्या अगदी जवळून जात, हा आगीचा पाऊस शेवटी हिंदी महासागरात आणि ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटी भागात कोसळला. भारतावरचे सर्वात मोठे संकट थोडक्यात टळले होते!














































































