बारामती |
दिवाळीच्या सणात बारामतीत देखील वेगळा उत्साह असतो. पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. स्वतः शरद पवार,सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.
देशात साजरे होणाऱ्या अनेक सणा पैकी दिवाळी हा सण मोठा मानला जातो.पाच दिवस साजरे होणार्या उत्सवातील पाडव्याला विशेष महत्त्व असते.देशभरातील अनेक मान्यवर कुटुंब आपपल्यापरीने दिवाळी,पाडवा साजरा करतात.मात्र बारामतीत पवार कुटुंबियांकडून साजरा केला जाणारा पाडवा अनेक अर्थाने वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण असतो.
हा दिवस पवार कुटुंबीय सगेसोयरे,मित्रपरिवार,कार्यकर्ते यांच्यासाठी देतात.पवार कुटुंबियांना विशेषता पवार साहेबांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षातील दिग्गज व्यक्ती मित्र,तरुण व वृद्ध येत असतात.मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबियांना नागरिकांना भेटता आले नाही. तसेच राज्यातील कानाकोपऱ्यातील नागरिकांना पवार साहेबांना भेटता न आल्यामुळे खंत होती.सध्या दोन वर्षांच्या काळानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पवार कुटुंबीय सर्वांना भेटत आहेत.त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती
दिवाळी पाडव्यानिमित्त कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी यंदा उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र उपस्थित नव्हते.त्यामुळे ते नेमके कुठे आहेत आणि का आले नाहीत,याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा रंगली होती.मात्र खुद्द शरद पवारांनीच अजित दादांच्या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले.अजित पवारांच्या घरातील 3 कर्मचारी कोरोना बाधित तर 2 ड्रायव्हर कोरोना बाधित झाले आहेत त्यामुळे अजित पवार उपस्थित राहू शकले नाहीत, असे शरद पवार यांनी सांगितले.