Last Updated on 10 Feb 2026 6:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई |
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील आपल्या दालनात स्वीकारला. यावेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ विभागांचा पदभारही त्यांनी स्वीकारला.
यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख यांच्यासह आमदार, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी आज सकाळी मंत्रालयात पदभार स्वीकारण्यापूर्वी स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेब, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, पार्थ अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सिद्धिविनायकाचे दर्शन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, पार्थ अजित पवार, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.









































































