Last Updated on 08 Feb 2026 6:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर ते जत… गुलाल कुणाचा उधळणार?
सांगली ।
सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या निवडणुकांचा निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास उरले असताना जिल्ह्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. 7 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या मतदानानंतर आता 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्याआधीच जिल्हाभरात दावे-प्रतिदावे, विजयाच्या पैजा आणि पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
जिल्ह्यात सरासरी 69.76 टक्के मतदान झाल्याने अनेक मतदारसंघांत चुरशीची लढत झाल्याचे स्पष्ट होत आहे. सत्ताधारी गटाकडून “बहुमत आमचेच” असा दावा केला जात असताना, विरोधी गटाकडूनही “मतदारांनी सत्ताधाऱ्यांना धडा शिकवला” असा प्रतिदावा केला जात आहे. त्यामुळे निकालाचे चित्र शेवटच्या फेऱ्यांपर्यंत अस्पष्ट राहण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
दरम्यान, अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये विजयाच्या पैजा रंगल्या आहेत. कोणत्या तालुक्यात किती जागा येणार, कोणता गट आघाडीवर राहणार, यावर चहा टपरीपासून राजकीय बैठकांपर्यंत जोरदार चर्चा सुरू आहे. काही मतदारसंघांत अगदी किरकोळ मतांच्या फरकाने निकाल लागेल, असा अंदाज व्यक्त होत असल्याने प्रत्येक फेरी महत्त्वाची ठरणार आहे.
हेही वाचा : सांगली जि.प. निकालाची उत्सुकता वाढली; उद्या 191 टेबलवर 122 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी!
पडद्यामागे मात्र वेगळेच गणितं सुरू असल्याची चर्चा आहे. संभाव्य त्रिशंकू परिस्थिती लक्षात घेऊन काही गटांनी आतापासूनच “निकालानंतरच्या समीकरणांवर” लक्ष केंद्रित केल्याचे बोलले जात आहे. अपक्ष आणि प्रभावशाली उमेदवारांभोवती विशेष लक्ष केंद्रीत झाले असून, निकालानंतर कोणत्या बाजूने झुकणार याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
प्रशासनाने मतमोजणीसाठी कडेकोट तयारी केली असून, जिल्ह्यात 10 तालुक्यांत 191 टेबलवर 122 फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. शांतता राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही आणि नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात येणार आहेत.
एकंदरीत, सांगली जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल केवळ आकड्यांचा खेळ न राहता, पुढील राजकीय दिशा ठरवणारा ठरणार आहे. त्यामुळे “विजय कोणाचा?” हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे, तितकीच उत्सुकता “किती फरकाने?” आणि “निकालानंतर कोण कोणासोबत?” याबाबतही निर्माण झाली आहे.











































































