Last Updated on 02 Feb 2026 10:56 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
नऊ वर्षांनी केवळ निवडणुकीपुरते येऊन, पैशाचे आमिष दाखवून आता काहीजण निवडणूक लढवित आहेत. मात्र बागणीच्या स्वाभिमानी मतदारांनी असा प्रासंगिक करार करणाऱ्यांना कायमचे बाजूला सारावे, असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केले. पाऊस पडेल, पण लक्ष देऊ नका, असा उपरोधिक टोलाही त्यांनी हाणला.
बागणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार ऊर्मिला संतोष घनवट आणि पं. स. उमेदवार उदयसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी मोमीन मोहल्ला येथे झालेल्या सभेत जयंत पाटील बोलत होते. जयंत पाटील यांनी यावेळी महायुतीच्या नेत्यांवर नाव न घेता टीका केली.
ते म्हणाले, या गावाने एकमताने ऊर्मिला संतोष घनवट यांचे नाव सुचविले आहे. यामुळे घनवट यांना मोठे मताधिक्य मिळणार आहे.
पाटील म्हणाले, विरोधक ज्या पक्षाचे आहेत, त्या पक्षाच्या चिन्हावर काही चालणार नाही, म्हणून त्यांनी दुसरे चिन्ह घेतले आहे. पण ही मतदारांची दिशाभूल आहे. नऊ वर्षांत न फिरकणाऱ्यांना, बागणीची जनता स्वस्त नाही हे दाखवून देण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.
माजी जि. प. सदस्य संभाजी कचरे म्हणाले, विरोधकांना २०१७ मध्ये जनतेने जागा दाखवून दिली आहे. तरीही ते पुन्हा उभे आहेत. पैसा वापरून मतदान मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न मतदारसंघातील मतदारच हाणून पाडल्याखेरीज राहणार नाही.
यावेळी वैभव शिंदे, उदयसिंह पाटील यांचेही भाषण झाले.
जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे, सुस्मिता जाधव, सुनीता देशमाने, बाळासाहेब पाटील, संग्राम जाधव, संतोष घनवट, उर्मिला संतोष घनवट, लक्ष्मणराव माळी, विलास माळी, अल्लाउद्दीन चौगले, माजी सरपंच राजेंद्र पवार, माजी उपसरपंच सुभाष हवलदार, मुबारक मिंचेकर, संजय पवार, माजी सरपंच अन्सार चौगले उपस्थित होते.












































































