Last Updated on 02 Feb 2026 10:47 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली ।
केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये भारताच्या औषधनिर्माण आणि बायोफार्मा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी अनेक प्रमुख उपक्रमांची घोषणा केली. अर्थमंत्र्यांनी सांगितले की सरकारने रोजगार निर्मिती, उत्पादकता वाढवणे आणि विकासाला गती देण्यासाठी व्यापक आर्थिक सुधारणा हाती घेतल्या आहेत. आर्थिक विकासाला आणखी गती देण्यासाठी आणि तो कायम राखण्यासाठी औषधनिर्माण क्षेत्रासह 7 धोरणात्मक आणि आघाडीच्या क्षेत्रांमध्ये उत्पादन वाढविण्यावर मंत्र्यांनी भर दिला.
बायोफार्मा शक्ती भारताला जागतिक जैव उत्पादन केंद्र म्हणून स्थापित करणार
दीर्घायुष्य आणि गुणवत्तापूर्ण जीवनमानासाठी परवडणाऱ्या दरात जैविक औषधांचे महत्त्व अधोरेखित करताना, अर्थमंत्र्यांनी पुढील पाच वर्षांमध्ये 10,000 कोटी रुपयांच्या एकूण खर्चासह ‘बायोफार्मा शक्ती (ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाद्वारे आरोग्यसेवा उन्नतीसाठी धोरण)’ ची घोषणा केली. हा कार्यक्रम बायोलॉजिक्स आणि बायोसिमिलर्सच्या देशांतर्गत उत्पादनासाठी एक मजबूत आणि स्वयंपूर्ण परिसंस्था तयार करून भारताला जागतिक जैवऔषध उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने तयार केला आहे.
हा उपक्रम प्रगत जैवउत्पादन पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूकीला प्रोत्साहन देईल, नवोन्मेषाना चालना देईल आणि उच्च-मूल्य असलेल्या, पुढील पिढीच्या उपचारांमध्ये भारताची क्षमता वाढवेल, ज्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि आरोग्य सुरक्षा मजबूत होईल.
भारताच्या क्लिनिकल संशोधन क्षमतेचा विस्तार
बायोफार्मा शक्ती अंतर्गत, क्लिनिकल संशोधनासाठी पसंतीचे ठिकाण म्हणून भारताचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी, देशभरात 1,000 हून अधिक मान्यताप्राप्त क्लिनिकल चाचणी स्थळांचे जाळे तयार केले जाईल असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
मोठ्या प्रमाणात विस्तारामुळे:
- भारतात क्लिनिकल संशोधनाची गुणवत्ता आणि विश्वासार्हता वाढेल
- निर्धारित वेळेत औषध विकासाला गती मिळेल
- भारतीय रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचारपद्धती सहज उपलब्धता होतील
- संशोधक, वैद्यकीय व्यावसायिक आणि संबंधित क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण संधी निर्माण होतील
अर्थमंत्र्यांनी जाहीर केले की समर्पित वैज्ञानिक पुनरावलोकन कॅडर आणि तज्ञांच्या माध्यमातून जागतिक मानके आणि मंजुरीच्या मुदतीची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना मजबूत केली जाईल.
औषधनिर्माण शिक्षण आणि संशोधन मजबूत करणे: नवीन एनआयपीईआर
देशात औषधनिर्माण शिक्षण आणि संशोधन मजबूत करण्यावर भर देत, अर्थमंत्र्यांनी विद्यमान सात एनआयपीईआरच्या अपग्रेडेशनसह तीन नवीन राष्ट्रीय औषधनिर्माण शिक्षण आणि संशोधन संस्था (एनआयपीईआर) स्थापन करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे प्रगत औषधनिर्माण शिक्षण, उच्च दर्जाचे संशोधन आणि नवोन्मेष यासाठी भारताची क्षमता वाढेल. या प्रमुख संस्थांचा विस्तार आणि आधुनिकीकरण अत्यंत कुशल कार्यबल विकसित करण्यास, उद्योग-शैक्षणिक सहकार्याला चालना देण्यास आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक औषधनिर्माण आणि जैवऔषधशास्त्रीय क्षेत्राच्या वाढीस पाठिंबा देण्यास मदत करेल.
Source : Press Information Bureau












































































