Last Updated on 31 Jan 2026 7:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर राज्यासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत.
मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा लोकभवनातील दरबार हाॅलमध्ये पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली, आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला.












































































