Last Updated on 30 Jan 2026 9:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
करिअर कॉन्क्लेव्ह २०२६: गोव्याच्या युवकांना उदयोन्मुख करिअर संधींचे मार्गदर्शन करणाऱ्या मंचांचे आयोजन
पणजी ।
कामगार व रोजगार विभागाच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, बांबोळी येथे करिअर कॉन्क्लेव्ह २०२६ चे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना व युवकांना करिअर नियोजन, कौशल्य विकास तसेच उदयोन्मुख रोजगार संधींबाबत मार्गदर्शन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
दिवसभर चाललेल्या या कॉन्क्लेव्हमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर सत्र, संवादात्मक चर्चा तसेच विविध करिअर पर्याय, स्टार्ट-अप्स, स्वयंरोजगाराच्या संधी आणि शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. या मंचामुळे विद्यार्थ्यांना तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली, उद्योगांच्या गरजा समजून घेता आल्या तसेच पारंपरिक आणि नव्या क्षेत्रांतील संधींचा शोध घेता आला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, भारत हा जगातील सर्वात तरुण देश असून युवकांची संख्या मोठी असल्यामुळे राष्ट्रनिर्मितीत त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, आज विद्यार्थी जे निर्णय घेतात, तेच त्यांचे भविष्य घडवतात. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा, डिजिटल मीडिया आणि नवीकरणीय ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. आजच्या काळात केवळ पदव्या नव्हे, तर सातत्यपूर्ण शिक्षण, बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता आणि प्रत्यक्ष कौशल्येही रोजगारक्षमतेसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी अद्ययावत राहावे, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा आणि सुज्ञ करिअर निर्णय घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, राज्य सरकार युवकांना सक्षम करण्यासाठी कौशल्य, पुनःकौशल्य आणि उन्नत कौशल्य (स्किल, रिस्किल, अपस्किल) उपक्रमांवर सातत्याने भर देत आहे. मुख्यमंत्री रोजगार योजना तसेच गोवा मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप धोरण यांसारख्या योजनांचा उल्लेख करत त्यांनी या योजनांद्वारे युवकांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष अनुभव व रोजगार सहाय्य दिले जात असल्याचे स्पष्ट केले. विकसित गोवा या दृष्टीकोनावर भर देत विद्यार्थ्यांनी सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या संधी व मंचांचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास कामगार व रोजगार मंत्री अतानासियो मोन्सेरात, आयएएस आयुक्त-सह-सचिव श्री. संदीप जॅक्स, कामगार व रोजगार आयुक्त राजेश एस. अजगावकर तसेच अन्य मान्यवर, अधिकारी, तज्ज्ञ आणि विद्यार्थी उपस्थित होते.









































































