Last Updated on 14 Jan 2026 9:41 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली |
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजताच वाळवा तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे वाळवा पंचायत समितीचे सभापती पद ‘सर्वसाधारण (खुले)’ प्रवर्गासाठी असल्याने, तालुक्यातील आठ खुल्या गणांवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. या गणांतून निवडून येणारा उमेदवारच भविष्यात सभापतीपदाचा प्रमुख दावेदार ठरणार असल्याने, येथेच खरी राजकीय चढाओढ होणार असल्याचे चित्र आहे.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या आरक्षण सोडतीनंतर अनेक मातब्बर नेत्यांचे मतदारसंघ राखीव झाले आहेत. आज निवडणूक जाहीर होताच, कोणत्या गटातून कोणाला मैदानात उतरवायचे, यासाठी जयंत पाटील गट आणि महायुतीमध्ये खलबते सुरू झाली आहेत. विशेषतः २२ गणांपैकी ११ जागा महिलांसाठी राखीव असल्याने महिला राजकारण्यांना मोठी संधी मिळणार आहे.
सभापती पद ‘खुले’ असल्याने ८ गणांत पेटणार रणकंदन!
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजताच वाळवा तालुक्यात राजकीय वावटळ सुटली आहे. विशेषतः वाळवा पंचायत समितीचे सभापती पद ‘सर्वसाधारण’ असल्याने, तालुक्यातील ८ खुल्या गणांमधील उमेदवारीला सोन्याचे मोल आले आहे. या गणांतून निवडून येणारा चेहराच भविष्यात तालुक्याचा ‘सभापती’ होऊ शकतो, हे ओळखून मातब्बर इच्छुकांनी आता पक्षाकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या आरक्षण सोडतीनुसार, वाळवा पंचायत समितीचे २२ पैकी ८ गण हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटले आहेत. बोरगाव, नेर्ले, वाटेगाव, कामेरी, चिकुर्डे, कारंदवाडी, बागणी, येलूर हे गण सर्वसाधारण आहेत.
उमेदवारीसाठी ‘आरपार’ची लढाई
सभापतीपदाची महत्त्वाकांक्षा असलेल्या अनेक मातब्बर नेत्यांची स्वतःची गावे आरक्षित झाल्याने, त्यांनी आता या खुल्या गणांकडे मोर्चा वळवला आहे. “गणातून निवडून आलो, तरच सभापती होता येईल,” या गणितातून अनेक इच्छुक नेते आपल्या पारंपरिक मतदारसंघाबाहेर जाऊन नशीब आजमावण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उमेदवारी देताना पक्षनेतृत्वासमोर मोठा पेच निर्माण होणार आहे.
वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (शरद पवार व अजित पवार), भाजप तसेच स्थानिक विकास आघाड्यांमध्ये थेट सामना अपेक्षित आहे. सभापती पद आपल्या गटाकडे यावे, यासाठी प्रत्येक पक्ष या आठ खुल्या गणांमध्ये ‘विजयी चेहरा’ देण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या गणांमध्येच खऱ्या अर्थाने राजकीय रणकंदन पेटण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
वाळवा पंचायत समितीचे ‘हे’ आहे आरक्षण :
(वाचकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा)
सर्वसाधारण गण : बोरगाव, नेर्ले, वाटेगाव, कामेरी, चिकुर्डे, कारंदवाडी, बागणी, येलूर.
सर्वसाधारण महिला : गोटखिंडी, बहादूरवाडी, पडवळवाडी, कासेगाव, बावची, वाळवा, पेठ.
OBC प्रवर्ग : ऐतवडे बुद्रुक, साखराळे (पुरुष) आणि रेठरेधरण, रेठरेहरणाक्ष, कि.म.गड (महिला).
SC प्रवर्ग : कुरळप (पुरुष) आणि ताकारी (महिला).
वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषद गटाचे आरक्षण असे :
१) वाळवा – ना. मा. प्र.
२) बोरगाव – ना. मा. प्र.महिला
३) कामेरी – सर्वसाधारण
४) पेठ – ना. मा. प्र.महिला
५) येलूर – सर्वसाधारण महिष्ण
६) कासेगाव – सर्वसाधारण महिला
७) वाटेगाव – सर्वसाधारण महिरण
८) चिकुर्डे – सर्वसाधारण
९) बागणी – सर्वसाधारण महिला
१०) बावची – सर्वसाधारण
११) रेठरे हरणाक्ष – सर्वसाधारण महिला
राजकीय पेच आणि डावपेच
वाळवा तालुक्यात हुकमी एक्का मानल्या जाणाऱ्या नेत्यांना आता आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना आरक्षित जागांवर संधी देताना मोठी कसरत करावी लागणार आहे. ज्या जागा खुल्या (General) आहेत, तिथे उमेदवारांची संख्या सर्वाधिक असून बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान पक्षांसमोर असेल. आजपासूनच तालुक्यात आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासकीय पातळीवरही निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू झाली आहे.
आरक्षणामुळे बदलली राजकीय समीकरणे
ज्या इच्छुकांनी ‘ZP Election 2026’ च्या तयारीसाठी गेल्या सहा महिन्यांपासून मोर्चेबांधणी केली होती, त्यांच्यासाठी आता प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. वाळवा पंचायत समितीच्या २२ जागांपैकी ११ जागा महिलांसाठी राखीव आहेत, ज्यामुळे महिला नेतृत्वाला मोठी संधी मिळणार आहे. कुरळप आणि ताकारी यांसारख्या राखीव जागांवर आता जातीच्या दाखल्यांची आणि जातवैधता प्रमाणपत्राची धावपळ सुरू झाली आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक एका नजरेत:
अर्ज भरण्याची मुदत : १६ ते २१ जानेवारी २०२६
मतदान तारीख : ५ फेब्रुवारी २०२६
मतमोजणी : ७ फेब्रुवारी २०२६












































































