Last Updated on 30 Dec 2025 3:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नागरिकांची गर्दी, महा अंनिसकडून प्रबोधन
सांगली । वाळवा तालुक्यातील कामेरी येथील स्मशानभूमीत आज सकाळी अघोरी करणीचा, जादूटोणाचा प्रकार उघडकीस आला आहे. हे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. याची माहिती मिळताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (महा अंनिस) कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांशी संवाद साधत प्रबोधन केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना ही बातमी समजतात कार्यकर्त्यांनी कामेरीच्या स्मशानभूमीकडे तात्काळ धाव घेतली. महा अंनिस चे राज्याचे कार्याध्यक्ष संजय बनसोडे, जिल्हा प्रधान सचिव डॉ राम घुले, अजय भालकर, विनोद मोहिते, बाळासाहेब पाटील, दिलीप क्षीरसागर, आरती सावंत, स्नेहल सूर्यवंशी, अमृत काळे आदी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधत, त्यांचे प्रबोधन केले. त्यांनी करणी, जादूटोण्याचे साहित्य गोळा केले.
स्मशानभूमीतील झाडाला काळया कपड्यात दोन गाढोटी होत्या. त्यामध्ये काळया बाहुल्या, करणीचे साहित्य आढळून आले. तर स्मशानभूमीच्या कठड्यावर एका मोठ्या मडक्यात काळी बाहुली, पन्नास लिंबू, त्यातील कापलेले होते, हळद, कुंकू टाकलेला होता. पपई, उडीद, कणीक, काळे, हिरवे कापड, कापडी स्कार्फ, फुलांचा गजरा, पितळेचे लोखंडाचे खिळे, कवड्या, काळे तीळ, वेलीची चुंबळ तसेच प्राण्याच्या काळजाचे तुकडे ही होते. सदरचा प्रकार भयावह वाटत होता. विवाहित महिलेवर ही करणी, जादूटोणा करण्याच्या इराद्याने कोणत्यातरी मांत्रिकाने हा प्रकार करायला लावला असावा असा अंदाज आहे.

यावेळी राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे म्हणाले की, कामेरी गाव हे क्रांतिकारकाचा आणि सत्यशोधकी विचाराचा वारसा असणारे गाव आहे. अशा गावात हा प्रकार होतो आहे ही निषेधार्य गोष्ट आहे. असा जादूटोणा किंवा करणीचा प्रकार करून कोणत्याही व्यक्तीचे कसल्याही प्रकारचं नुकसान होत नाही किंबहुना असे प्रकार करून कुणाचे चांगले होत नाही. असे अघोरी प्रकार करणाऱ्या मांत्रिक, बुवाबाबाचा आम्ही शोध घेत आहे. गावातील लोकांनी अशा अंधश्रद्धांना, करणींना अजिबात घाबरता कामा नये. खरे तर गावातील तरुणांनी स्वतःच पुढाकार घेऊन अशा गोष्टी बाजूला केल्या पाहिजेत. निर्भयपणे अशा करणी जादूटोणा करणाऱ्या लोकांना प्रतिबंध केला पाहिजे”
आम्ही पुढील दोन दिवसात गावात जाहीर सभा घेऊन ग्रामस्थांचं प्रबोधन करून त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचे काम करणार आहे.









































































