सांगली । भाजपाचे जेष्ठ नेते, माजी नगरसेवक एल.एन.शहा, त्यांचे चिरंजीव भाजपाचे शहर उपाध्यक्ष उमेश रायगांधी यांनी माजी मंत्री आ.जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष स्व.अशोकदादा पाटील यांचे चिरंजीव, उरूण सेवा सोसायटीचे अध्यक्ष महेश पाटील, भाजपाचे माजी विरोधी पक्ष नेते विजय कुंभार, तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, जेष्ठ नेते बी.ए.पाटील, माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील, मुनीर पटवेकर, अरुणादेवी पाटील, महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात प्रामुख्याने उपस्थित होते.
आ.पाटील म्हणाले, माजी नगरसेवक एल.एन.शहा यांनी शहरातील नागरिकांची चांगली सेवा केली आहे. ते आमचेच होते, पुन्हा स्वगृही आले आहेत, त्याचा आम्हास मनस्वी आनंद होत आहे.आज एक मंत्री म्हणाले,आमच्या लोकांना साथ द्या, शहरातील पिण्याचे पाणी, गटारी आदी प्रश्न मार्गी लावू. मग त्यांनी गेली ९ वर्षे शहराचे प्रश्न का सोडविले नाही? अनेक तरुण कार्यकर्ते संपर्कात आहेत. येत्या काही दिवसात तेही निर्णय होतील. महेश पाटील व विजय कुंभार यांना ओढण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते ठामपणे आमच्याबरोबर आहेत.
एल.एन.शहा म्हणाले, आम्ही पूर्वी आ.जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. आता पुन्हा स्वगृही आल्याचा आनंद आहे. मी गेली ४० वर्षे विरोधी पक्षात काम केले,मात्र त्यांना आता आमची अडचण वाटते. या शहराचा विकास करावयाचा असेल,या शहरातील नागरिकांना चांगल्या सोई-सुविधा द्यायच्या असतील,तर ते आ.जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालीच होऊ शकते. आम्ही मनात कोणताही स्वार्थ न ठेवता त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेला आहे.
महेश पाटील म्हणाले, हे शहर चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात जाऊ द्यायचे नाही. त्यांच्या विरोधातील लढाई आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली लढू आणि जिंकू. साहेबांनी गृहमंत्री असताना अनेक जेल बांधले आहेत. साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर यातील बरेच लोक त्या जेलमध्ये जातील. आता आपण उमेदवारीवरून कोणतेही रुसवे-फुगवे न ठेवता आनंदराव मलगुंडेदादा यांना १० हजारांनी विजयी करण्यासाठी जीवाचे रान करूया. माझ्या वडिलांचे आपल्यातील अनेक कुटुंबाशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध होते,ते जपण्याचे काम करू.
प्रारंभी शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी दादासाहेब पाटील,सुरेंद्र दादा पाटील, बाळासाहेब पाटील (धनी),शंकरराव चव्हाण, संदीप पाटील,शैलेश पाटील,शंकरराव पाटील,संजयकाका पाटील,रोझा किणीकर, दिग्विजय पाटील,सचिन कोळी,परेश पाटील, विजय देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









































































