Last Updated on 10 Oct 2025 6:31 AM by Sanjay Patil/Adhorekhit
कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली माहिती
सन २०२४-२५ हंगामासाठी जयवंत शुगर्सचा दर घोषित
कराड । धावरवाडी (ता.कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याने सन २०२४-२५ सालच्या हंगामात गळितास आलेल्या ऊसासाठी ३२६० रुपयांचा अंतिम दर जाहीर केला आहे. कारखान्याने यापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३२०० रुपये अदा केले आहेत. तर आज उर्वरित ६० रुपयांचा अंतिम हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती, जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की जयवंत शुगर्सने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देत ऊस उत्पादकांना चांगला दर देण्याचे धोरण स्वीकारले आहे. कारखान्याने सन २०२४-२५ सालच्या गळीत हंगामात ५,५०,६४२ मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले असून, सरासरी साखर उतारा १२.५२ टक्के राहिला आहे.
कारखान्याने गेल्या गळीत हंगामासाठी ३२६० रुपयांचा अंतिम दर जाहीर केला असून, यापैकी ३२०० रुपयांप्रमाणे बिल अदा करण्यात आले आहे. तसेच आज विनाकपात ६० रुपयांचा अंतिम हफ्तादेखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे. जयवंत शुगर्सने ऊस उत्पादकाच्या खात्यावर प्रतिटन ६० रूपयांचा हफ्ता वर्ग केल्याने, शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.












































































