मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
सोलापूर । महाराष्ट्रातील निसर्ग आणि जंगलावरील कांदबऱ्यांनी घराघरात पोहचलेले साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले.
30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यावेळी दिल्लीतून परतल्यापासूनच त्यांची प्रकृती बरी नव्हती. अखेर, आज संध्याकाळी 7 च्या सुमारास सोलापुरातील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. जंगल आणि पक्ष्यांविषयीच्या अभ्यासामुळे अरण्यऋषी म्हणून ओळखले जात होते.
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, वन विभागात काम करताना चितमपल्ली यांनी आगळा दृष्टीकोन बाळगून काम केले. त्यांनी अनेक निसर्ग किमया आपल्या निरिक्षणातून शब्दांनी चितारल्या. त्यासाठी त्यांनी गाढा अभ्यासही केला. आदिवासी तसेच राना-वनात राहणाऱ्या बांधवांकडे असलेले निसर्गाविषयीचे ज्ञान त्यांच्यामुळेच शब्दबद्ध झाले. पक्षितज्ज्ञ, निसर्गलेखक, वन्यजीवांचा अभ्यासक अशी त्यांनी ओळख मिळवली. त्यांच्यामुळे मराठी भाषेला राना-वनातील, निसर्गाशी निगडीत अस्सल असे शब्द मिळाले. त्यांच्या आत्मचरित्राचे नावच चकवाचांदण- एक वनोपनिषद असे होते. त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी संस्कृतचाही अभ्यास केला. सोलापुरला झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. त्यांचे निसर्गाविषयीचे लेखन, अभ्यास- संशोधन, पक्षिकोश अशी साहित्य संपदा मराठी भाषेचे वैभव वाढणारे संचित आहे. ही आपल्या सर्वांसाठी एक अमुल्य असा ठेवा आहे. दिवंगत चितमपल्ली यांचा सोलापूर ते नागपूर आणि पुन्हा नागपूर ते सोलापूर असा प्रवास राहीला आहे. विदर्भातही त्यांचा मोठा गोतावळा आहे. जंगलातील अनेकांशी त्यांचे ऋणानुबंध राहीले आहेत. या सगळ्या प्रवासात ते आयुष्यभर निसर्ग आणि मराठी साहित्य क्षेत्राशी व्रतस्थ राहीले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील निसर्ग अभ्यासक, तसेच साहित्य क्षेत्रासाठीचा दिपस्तंभ निमाला आहे, ही एक मोठी हानी आहे.
दिवंगत चितमपल्ली यांचे कुटुंबिय आणि स्नेही यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना, असे नमूद करून, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ज्येष्ठ साहित्यिक, अरण्यऋषी, पद्मश्री मारूती चितमपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.