जिल्हा परिषदेचा दहावीपर्यंत आठवण जपणारा आगळावेगळा उपक्रम
नांदेड । जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने यंदा पहिल्या वर्गात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव आणि भावनिक उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मेघना कावली यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील प्रारंभ अधिक गोड आणि संस्मरणीय ठरणार आहे.
१६ जूनपासून सर्व शाळा सुरू होत असून, पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक विशेष “आठवणींचा फॉर्म” देण्यात येणार आहे. या फॉर्ममध्ये शाळेचे नाव, तालुका, विद्यार्थ्याचे नाव, आई-वडिलांची नावे, विद्यार्थ्याने लिहिलेले पहिले मराठी व इंग्रजी अक्षर, पहिली संख्या, त्याचे स्वतःचे विचार आणि एक छायाचित्र अशा विविध गोष्टींची नोंद घेण्यात येईल.
या फॉर्मवर “हे पत्र २०३५ ला उघडून पहा आणि आमची आठवण करा…” असा खास संदेश लिहिण्यात आला असून, जेव्हा हे विद्यार्थी दहावीत पोहोचतील, तेव्हा त्यांनी हा फॉर्म पुन्हा उघडून पहावा आणि आपल्या शालेय जीवनाच्या पहिल्या दिवसाच्या आठवणींना उजाळा द्यावा, असा या उपक्रमामागील मनापासूनचा हेतू आहे.
हा फॉर्म शाळेकडे किंवा पालकांकडे सुरक्षित ठेवला जाणार असून, विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी तो एक अनमोल आठवण ठरणार आहे.
शालेय शिक्षणाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भावनिक नातं निर्माण करणारा, शाळेशी आत्मीयता वाढवणारा आणि शिक्षण प्रक्रियेविषयी आत्मस्मरण जागवणारा हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सर्जनशीलतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा : मुंबई | माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख (वय ५५ वर्षे) यांचे शनिवारी (दि.१२) हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने न... Read more