सांगली । राज्यातील आशा सेविकांना गेल्या ७ महिन्यापासून वेतन मिळालेले नाही, हे दुर्दैवी आहे. राज्यकर्त्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे लोकाभिमुख प्रशासनाचे धडे गिरवावेत. राज्यातील आशा सेविकांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू,अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथे दिली.
इस्लामपूर येथील राष्ट्रवादी भवनमध्ये उरूण इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा सेविकांचा आ.पाटील यांच्या हस्ते भेट वस्तू देऊन गौरव करण्यात आला. प्रा.शामराव पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, शहराध्यक्षा पुष्पलता खरात, माजी अध्यक्षा रोझा किणीकर, प्रदेश सदस्या कमल पाटील, आशा गट प्रवर्तक मनिषा पाटील, माया जाधव प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
आ.पाटील म्हणाले, आशा सेविका या समाजाच्या आरोग्य सेवेचा कणा आहेत. सामाजिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. मात्र सध्या त्यांच्यावर अन्याय होताना दिसतो. सरकारवर कर्जाचे ओझे असल्याने त्यांचे वेतन त्यांना वेळेवर मिळत नाही. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू. महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात म्हणाल्या, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी लोकाभिमुख कारभार करून वंचित घटकांना न्याय मिळवून दिला. आम्ही त्यांचा आदर्श डोळयासमोर ठेवून समाजासाठी राबणाऱ्या आशा सेविका भगिनींचा सन्मान करीत आहोत.
याप्रसंगी शहर उपाध्यक्षा मनिषा पेठकर, मालन वाकळे, सुनंदा साठे, शैलजा जाधव, सविता सावंत, दीप्ती जगताप, अंजना चव्हाण, सुहासिनी जंगम यांच्यासह आशा सेविका उपस्थित होत्या.