Last Updated on 24 May 2025 7:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतीसाठी विशेषतः ऊस शेतीसाठी वरदान ठरत असलेले कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचविणार आहोत. व्हीएसआय पुणे व कृषी विज्ञान केंद्र बारामती या संस्थांशी करार प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. एआय तंत्रज्ञानाने आपल्या परिसरात शेती क्षेत्रात मोठी क्रांती घडेल,असा विश्वास राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी रेठरेधरण व वाटेगाव येथील सभासद संपर्क दौऱ्यात बोलताना व्यक्त केला. त्यांनी नायकलवाडी,ओझर्डे, घबकवाडी,जांभूळवाडी,भाटवडे,काळमवाडी, शेणे,सुरूल आदी गावांचा सभासद दौरा पूर्ण केला.
माजी जि.प.अध्यक्ष,कारखान्याचे संचालक देवराज पाटील, संचालक अतुल पाटील, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, सचिव डी.एम.पाटील, जलसिंचन अधिकारी जे.बी.पाटील, ऊस पुरवठा अधिकारी नितीन पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले होते. वाटेगाव येथे माजी सभापती रविंद्रकाका बर्डे,सरपंच नंदाताई चौगुले, माजी सरपंच प्रकाश पाटील, राजीव बर्डे,माजी सभापती सुवर्णा जाधव, रेठरेधरण येथे सरपंच हर्षवर्धन पाटील, माजी पं.स.सदस्य शामराव पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रतीक पाटील म्हणाले, माजी मंत्री आ.जयंत पाटील हे व्हीएसआयच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत. आपण सध्या बारामती येथे एआय तंत्रज्ञानाने केलेल्या ऊस शेती पाहण्यास आपल्या प्रगतशील शेतकऱ्यां ना पाठवीत आहोत. आपण कोणी इच्छुक असल्यास शेती खात्याशी संपर्क करावा. आपण कारखान्याच्या वतीने भागा-भागात वेदर स्टेशन उभा करणार असून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात सेन्सॉर पॉईंट बसवून घ्यायची आहेत. आपल्या कारखाना कार्यक्षेत्रात जास्तीत-जास्त क्षेत्र एआय तंत्रज्ञानाच्या अंतर्गत आणण्याचा प्रयत्न करीत आहोत.
मध्यंतरी शासन निर्णयाच्या तांत्रिक अडचणीमुळे आपण भाग विकास निधी व इंडोमेन्ट ट्रस्टमधून निधी देणे बंद होते. सध्या आपण विविध कामे सुरू केली आहेत. आपल्या गावातील पाणंद रस्त्यांचा अर्ज द्यावा,आपण पहाणी करून जे आवश्यक आहे,ते करूया.
देवराज पाटील म्हणाले, प्रतीक पाटील हे सभासदांमध्ये जाऊन त्यांच्या अडी- अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. येत्या काही दिवसात आपणास निश्चित बदल दिसेल. अतुल पाटील म्हणाले,जे-जे सभासदांच्या हिताचे आहे,ते-ते करण्याचा प्रतिकदादांचा प्रयत्न आहे. माजी सभापती रविंद्र बर्डे यांनी ऊस तोडीसह अनेक दुरुस्त्या सुचविल्या. रेठरेधरणचे सरपंच हर्षवर्धन पाटील,आप्पा घाडगे वाटेगाव यांनी काही सूचना केल्या.
वाटेगाव येथे राहुल चव्हाण,संदीप कदम, किरण नांगरे, दिलीप कापसे,प्रदीप चव्हाण, अधिक पाटील,रेठरेधरण येथे विजयसिंह पाटील, विजय मुळीक,योगेश पाटील, राजेंद्र पाटील, महादेव पाटील, मदन पाटील, मानसिंग पाटील, डॉ.संतोष पाटील, विजय वाघमारे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










































































