पावसाळ्याच्या काळात आकाशात अचानक वीज चमकू लागते आणि काही क्षणात जोरदार कडकडाटासह वीज कोसळते. ही एक नैसर्गिक आपत्ती असली तरी योग्य सावधगिरी बाळगली, तर आपला जीव वाचवता येतो. ग्रामीण भागातील शेतकरी, मच्छीमार, तसेच जंगलात काम करणारे लोक यांना याचा विशेष धोका असतो. त्यामुळे वीज पडताना कोणती खबरदारी घ्यावी आणि काय टाळावे, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
“पावसाळ्यात विजा चमकणे व वीज कोसळणे या नैसर्गिक घटना सामान्य असल्या तरी त्यातून गंभीर अपघात व जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, मच्छीमार, जंगलात व मैदानी भागात काम करणारे नागरिक या धोक्याला अधिकतर सामोरे जातात. मात्र, योग्य काळजी घेतल्यास जीवितहानी टाळता येते. नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसांत अधिक सतर्क राहावे.”
रघुनाथ गावडे,
जिल्हाधिकारी, परभणी
आकाशातून कोसळणाऱ्या विजेपासून स्वतः चे रक्षण करण्यासाठी खालील दक्षता घ्यावी.
हे करा – शेतात काम करीत असताना शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्या. विद्युत उपकरणे बंद ठेवा. शक्य असेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टीक, गोणपाट अशा वस्तू, अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवा, तथापि डोके जमिनीवर ठेऊ नका. ओल्या शेतात अथवा तलावात काम करणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे, पोहणारे, मच्छिमारी करणारे यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे. झाडाच्या उंचीपेक्षा झाडापासून दुप्पट अंतरावर उभे रहा. एखादे उंच झाड सुरक्षित ठेवायचे असल्यास उंच वृक्षाच्या खोड अथवा फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे, म्हणजे हे झाड सुरक्षित होईल. वीजवाहक वस्तूंपासून दूर रहा. उदा. रेडीयटर, स्टोव्ह, मेटल, लोखंडी पाईप, टेलिफोनचे खांब, विजेचे खांब, टेलिफोन टॉवर यांपासून दूर रहा. मजबूत असलेले पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्या. वृक्ष, दलदलीची ठिकाणे तथा पाण्याचे स्त्रोत यापासून शक्यतो दूर रहा. तथापि मोकळ्या आकाशाखाली असण्यापेक्षा लहान झाडाखाली आसरा घेणे चांगले मोकळ्या आकाशाखाली राहणे आवश्यकच असेल तर खोलगट ठिकाणी रहा.
हे टाळा – विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका. झाडाखाली उभे राहू नका. उंच जागेवर, झाडावर चढू नका. पाण्याचे नळ, फ्रिज, टेलिफोन यांना स्पर्श करु नका. धातूंच्या वस्तूंपासून दूर रहा. प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू नका. दूरध्वनीचा वापर करु नका. गाव, शेत, आवार, बागबगीचा आणि घर यांच्या भोवती तारेचे कुंपन घालू नका. कारण ते विजेला सहजतेने आकर्षित करते. दोन चाकी वाहन, सायकल, ट्रक, ट्रॅक्टर, नौका यांवर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा. अशावेळी वाहनातून प्रवास करु नका. वाहनाच्या बाहेर थांबणे आवश्यक असल्यास धातूचे कोणतेही उपकरण हातात बाळगू नका. एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र राहू नका. दोन व्यक्तींमधील अंतर किमान 15 फूट असेल असे रहा. धातूची दांडी असलेल्या छत्रीचा उपयोग करु नका.
स्रोत : जिमाका, परभणी