सांगली । महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निशिकांत भोसले-पाटील यांची सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई येथे राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांनी ही निवड जाहीर केली. निवडीचे पत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व ना. छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ना.दिलीप वळसे पाटील, ना.आदिती तटकरे, ना.माणिकराव कोकाटे, ना.बाबासाहेब पाटील, आ.शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काॅग्रेस प्रदेशध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी यांच्या उपस्थितीत निशिकांत भोसले-पाटील यांनी स्विकारले.
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी व विचारसरणी ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी ही जबाबदारी देण्यात आली असून, श्री. पाटील पक्षाच्या ध्येयधोरणांची अंमलबजावणी करत पक्षवाढीसाठी सक्रिय योगदान देतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
नवीन जबाबदारी मिळाल्याबद्दल निशिकांत भोसले-पाटील यांचे पक्षातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे
.
पक्षबांधणीबरोबर रखडलेल्या विकासकामांना प्राधान्य देणार : निशिकांत भोसले-पाटील
राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाची सांगली जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर मोठ्या विश्वासाने दिली आहे, ती सार्थ ठरविण्यासाठी आहोरात्र प्रयत्न करणार आहे. जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पक्ष वाढीबरोबर पक्षाचे विचार प्रत्येक नागरीकांपर्यत व घराघरात पोहचविण्यासाठी विशेष मोहीम आखली जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यकारणीमध्ये राजकारण, समाजकारणाची आवड असणार्यांना व पक्षासाठी वेळ देणार्या चेहर्यांना संधी दिली जाणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष संघटनाबांधणीबरोबर भविष्यात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती प्रथम क्रमांकावर राहील असे नियोजन सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन, सर्वामध्ये समन्वय करुन करणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे, खा. प्रफुल्ल पटेल यांनी मला दिलेल्या संधीबद्दल त्यांचे आभार मानतो. भविष्यात पक्षाच्या माध्यमातुन पक्ष संघटनाबांधणी बरोबर सांगली जिल्ह्यातील रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न राज्य सरकारच्या स्तरावर करणार असल्याचे मत राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्याचे नुतन अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी व्यक्त केले.