सांगली | जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर या शहराचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मागणीला आता पुन्हा एकदा चालना मिळाली असून, राज्याचे माजी राज्यमंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे.
या मागणीमागे स्थानिक जनतेचा, विशेषतः बहुसंख्य हिंदू समाजबांधवांचा ठाम पाठिंबा असून, या संबंधी विविध संघटनांनी वेळोवेळी निवेदने देऊन तसेच शांततामय मार्गाने आंदोलने करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सदर मागणी सर्वप्रथम १९८६ साली मांडण्यात आली होती. याशिवाय, सुमारे पन्नास वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन प्रमुख श्री. पंत सबनीस यांनीदेखील शासनाकडे इस्लामपूरचे नामकरण ‘ईश्वरपूर’ करण्याची विनंती केली होती.
ज्याप्रमाणे औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या अनुरूप नामांतर करण्यात आले, त्याच धर्तीवर इस्लामपूरचे ईश्वरपूर असे नामांतर करणे आवश्यक असल्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे.
यानुसार, सदर मागणीवर सकारात्मक विचार करून इस्लामपूर शहराच्या नामांतरास मान्यता देणेबाबतचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सदाभाऊ खोत यांना दिले आहे.