Last Updated on 18 Apr 2025 2:05 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली | वाळवा तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतींमधील सरपंच पदांसाठी २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी आरक्षण सोडत बुधवार, दि. २३ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात येणार आहे. ही सोडत इस्लामपूर येथील राजारामबापू नाट्यगृहात सकाळी ११ वाजता तहसील प्रशासनाच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
जिल्हाधिकारी सांगली यांच्या आदेशानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि महिलांसाठी (प्रत्येक प्रवर्गातील ५० टक्के स्त्री आरक्षणासह) सरपंच पदे आरक्षित करण्यात येणार आहेत.
तहसीलदार सचिन पाटील यांनी ग्रामपंचायतीतील सर्व संबंधित मतदार, ग्रामसेवक व सरपंच पदास इच्छुक असलेल्या उमेदवारांना या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमासाठी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
सदर आरक्षणाचा कालावधी १ एप्रिल २०२५ पासून ३१ मार्च २०३० पर्यंत राहणार असून, यामध्ये विविध सामाजिक गटांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे.
प्रवर्ग निहाय सरपंच आरक्षण खालील प्रमाणे : (महिला ५० टक्के आरक्षण)
अनुसूचित जाती – ११ (६)
अनुसूचित जमाती – १ (०)
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – २६ (१३)
खुल्या जागेसाठी – ५६ (२८)












































































