जालना : जालन्याच्या परतूर येथील महिला तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यावर हल्ला झाला आहे. जालना जिल्ह्यातील परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या पथकावर मुरूम उत्खनन करणाऱ्या माफियांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली आहे. यावेळी तहसीलदार प्रतिभा गोरे या देखील पथकासोबत होत्या.
परतूरमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन सुरू असल्याची माहिती परतूर तहसीलदार प्रतिभा गोरे यांना मिळाली होती. त्या माहितीवरून परतूर तहसीलदारांचं एक पथक अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलं होतं. यावेळी अवैधरित्या मुरूमचे उत्खनन करून सदरील मुरूम चोरट्या वाहतुकीसाठी हायवा वाहनात भरला जात असल्याचं तहसीलदारांच्या पथकाला आढळून आलं.
यावेळी कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदार आणि त्यांच्या पथकावर मुरूम माफियांनी हल्ला करून त्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. त्यानंतर हे हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.
दरम्यान या प्रकरणी तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Courtesy: Prasar Bharati