Last Updated on 20 Feb 2025 6:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
भूकंपाची नोंद झाली नसल्याचे आले आढळून
रायगड : पेण तालुक्यातील तिलोरे व सुधागड तालुक्यातील महागाव परिसरातील देऊळवाडी, कलाकाराई, भोप्याची वाडी, कवेले वाडी येथे भूगर्भातून आवाज येवून जमिन हादरल्याची घटना काल रात्री 11.30 ते 12.30 वाजताच्या दरम्यान घडली असे नागरिकांनी स्थानिक प्रशासनास कळविले होते. सदर घटना भूकंप नसून याबाबत भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
या घटनेची भारतीय हवामान विभाग मुंबई (IMD) नुसार तसेच कोयनानगर जि.सातारा येथील भूमापन केंद्र येथे भूकंपाची नोंद झाली नसल्याचे आढळून आले आहे.
या ठिकाणी तहसिलदार सुधागड यांनी पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला आहे. सदर घटनेत काही घरांचे किरकोळ नुकसान झाले असून जिवीतहानी झालेली नाही.
या ठिकाणच्या अधिक सर्वेक्षणासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पुणे यांना सदर ठिकाणी सर्वेक्षण करण्यास विनंती करण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.










































































