![]()
राजकारण म्हणजे केवळ विकासाच्या गोष्टी करणं नव्हे, तर सत्ता मिळवण्यासाठी खेळले जाणारं मोठं मैदान असतं. निवडणुकांच्या वेळी जनतेसमोर अनेक आश्वासनं दिली जातात, विकासाच्या गप्पा मारल्या जातात, पण निकाल लागताच सत्ताधाऱ्यांचा सूर बदलतो. ज्या जनतेच्या मतांवर ही मंडळी निवडून येतात, त्याच जनतेच्या समस्या विसरण्याचा त्यांचा एक नवा खेळ सुरू होतो.
आजकाल लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित झाली आहे. निवडणुका आल्या की नेते लोकांसमोर जातात, मोठमोठ्या घोषणा करतात, पण निवडून आल्यावर मात्र सामान्य नागरिक त्यांच्या कार्यालयाच्या उंबरठ्यावर उभे राहून प्रश्न विचारत राहतो. मग प्रश्न पडतो, हा न्याय आहे का?
विकास की निव्वळ घोषणा?
कुठलाही पक्ष असो, सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येकजण विकासाची भाषा करतो. पण प्रत्यक्षात अनेक योजनांचा फायदा गरिबांपर्यंत पोहोचत नाही. मोठमोठे प्रकल्प जाहीर होतात, पण ते केवळ कागदावरच राहतात. आणि विरोधी पक्ष देखील सत्ता गेल्यानंतरच जागा होतो. मग, हा खरा विकास आहे की केवळ सत्ता टिकवण्याचा डाव?
जनतेनेही थर्ड अंपायर व्हायला हवं
थर्ड अंपायर नेहमी अचूक निर्णय देतो, मग जनता का नाही? जर एखादा नेता काम करत नसेल, तर त्याला पुन्हा संधी का द्यायची? जर कोणी केवळ घोषणा देऊन जात असेल, तर त्याला जाब का विचारू नये? जनता जर जागरूक राहिली, तर राजकीय खेळाडूंचा हा बनाव किती दिवस टिकेल?
राजकारणात प्रत्येकजण आपली चूक झाकण्याचा प्रयत्न करतो, पण सत्य दडवता येत नाही. जर जनता जागरूक राहिली, प्रश्न विचारत राहिली, तर कोणत्याही नेत्याचा दिखावा फार काळ टिकू शकत नाही. राजकीय नेते थर्ड अंपायर बनून न्याय देतील अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे. पण जनतेनेच आपली भूमिका समजून घेतली, तर निकाल लोकशाहीच्या बाजूने जाईल.
– थर्ड अंपायर
![]()









































































