Last Updated on 29 Jan 2025 8:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
वाचन लेखनाची गोडी लावण्यासाठी इस्लामपुरातील सर्व शाळांमध्ये राबवण्यात येणार उपक्रम
सांगली । सोशल मीडियावर असणारी शाळकरी मुले पुन्हा वाचन लेखनाकडे वळवण्यासाठी मुक्तांगणने शहरातील सर्व शाळांसाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.क्वेस्ट संस्थेच्या गोष्टरंग उपक्रमातून विविध नाट्यछटा दाखवत मनोरंजनातून शिक्षण देण्यासाठीचा उपक्रम वाचन संस्कृती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास वाळवा शिक्षण संस्थेचे सचिव ॲड. धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केला.
इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूल अँड अँक्टिव्हिटी सेंटर मध्ये मुक्तांगण आणि क्वेस्ट संस्थेतर्फे गोष्टरंग या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. मुलांना वाचन व लेखनाची गोडी लावण्यासाठी शहरातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
ॲड पाटील म्हणाले,” बालशिक्षणात नाविन्यपूर्णता आणून लहानपणापासूनच मुक्तांगणमध्ये मुलांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडले जात आहेत. जागतिक पातळीवरच्या संकल्पना इथे रुजवल्या जात आहेत. खेळातून आणि अनुभवातून बालशिक्षणाचा मुक्तांगण पॅटर्न अनेकांसाठी पथदर्शी आहे.”
यावेळी पालक प्रतिनिधी जयकर शिंदे इंजीनियर असोसिएशनचे सुनील पाटील मुक्तांगणच्या अध्यक्ष सरोजिनी मोहिते उपस्थित होत्या. संचालिका वर्षाराणी मोहिते यांनी स्वागत केले. सचिव विनोद मोहिते यांनी आभार मानले.
काय आहे ” गोष्टरंग ” उपक्रम…!
प्रत्यक्ष रंगभूमीवरील कामाचा अनुभव असलेले सचिन वीर ( रत्नागिरी ) गणेश वसावे ( नंदुरबार ) सायली जोशी ( नांदेड) हे तरुण गोष्टरंग उपक्रमात मुलांच्या समोर नाट्य छटा सादर करत आहेत. प्रत्येक नाटकाचा कालावधी साधारण वीस ते पंचवीस मिनिटे आहे. अंगणवाडी, प्ले स्कूल, पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी या वयोगटांसाठी वेगवेगळी नाटकं बसवली आहेत. त्या नाटकांचे प्रयोग येत्या आठवड्यात इस्लामपुरात २० हुन अधिक वेगवेगळ्या शाळांमध्ये आहेत. गोष्टींच्या पुस्तकांवर आधारित काही खेळ व कृती घेतल्या जातील. त्यामुळे पुस्तकातील गोष्टी जिवंत होतील. यानिमित्ताने मुलांचे मनोरंजन तर होईलच आणि वाचन लेखनाची गोडी लागेल. बांबू , हाकांचा पूल, पेरू या गोष्टींचे सादरीकरण असेल.
विनोद मोहिते
आयोजक, गोष्टरंग











































































