जळगाव । पाचोरा तालुक्यातल्या, परधारे गावाजवळ संध्याकाळी ४ च्या सुमारास गाडीत आग लागल्याची अफवा पसरल्यानं पुष्पक एक्सप्रेसमधल्या काही प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या. त्याचवेळी, विरुद्ध दिशेनं येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसची धडक या प्रवाशांना बसल्यानं अपघात घडला. या अपघातात ८ ते १० जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. तर ३० ते ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना अतिशय वेदनादायी आहे, यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली अर्पण करतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मंत्री गिरीश महाजन तसंच वरिष्ठ सनदी अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनांबरोबर समन्वयानं काम करत आहे लखनौवरून मुंबईसाठी निघालेली पुष्पक एक्स्प्रेस जळगाव स्थानकावरून निघाल्यानंतर अलार्म चेन ओढल्यानंतर काही प्रवासी या गाडीतून खाली उतरले. मात्र समोरच्या ट्रॅकवरून बंगळुरुवरून दिल्लीकडे जाणारी कर्नाटक एक्स्प्रेसनं या प्रवाशांना धडक दिली, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आहे.
जखमी प्रवाशापर्यंत वैद्यकीय मदत पोहोचवण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेच्या वतीनं सुरु आहे. यामध्ये स्थानिक प्रशासनासह, प्रत्येक स्थानकावरील आणि जवळील डाॅक्टरांची मदत घेतली जात आहे. तसंच जळगाव स्थानकापासून अपघात बचाव व्हॅन रवाना केली आहे. अशी माहिती नीला यांनी दिली. उत्तरप्रदेशचे मुख्यंमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जळगावमध्ये झालेल्या या रेल्वे दुर्घटनेबद्दल, तीव्र शोक व्यक्त केला आहे. जखमींना तातडीनं उपचार मिळावेत याची खातरजमा करण्याचे आदेश त्यांनी उत्तरप्रदेश प्रशासनाला दिले आहेत. मृतांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी सहवेदनाही व्यक्त केली.
अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू
दरम्यान, या अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचारांचा खर्च सरकार करणार आहे. या मार्गावरुन मुंबईकडे चाललेल्या पुष्पक एक्सप्रेसच्या डब्याला आग लागल्याच्या अफवेनं जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी चेन खेचून गाडी थांबवली आणि डब्यातून खाली उतरले. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं चिरडल्यानं हा अपघात झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य
जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनासोबत समन्वयाने काम करीत आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
साभार : प्रसार भारती