कोल्हापूर । कृषी संशोधन संस्थांच्या पातळीवर ऊस तोडणी नंतरच्या पाचटाबाबत संशोधन करण्यात आले आहे. ऊस तोडणीनंतर शिल्लक राहणारा पाला न जाळता शेतात ठिबक सिंचन असल्यास सर्व सरीत व पाटाद्वारे पाणी देण्यात येत असल्यास एक आड एक सरीत ठेवल्यास पर्यावरण प्रदुषणाच्या अनुषंगाने होणाऱ्या समस्यांचे निराकरण होईलच शिवाय ऊस क्षेत्रामध्ये विना खर्चात बहुमोल असे लक्षणीय फायदे दिसुन येतील, असे संशोधनातून आढळून आले आहे. यासाठी खोडवा ऊसाचा पाला जाळू नका. हा पाला एक आड एक सरीत ठेवा, असे आवाहन कृषी उपसंचालक एन.एस.परीट यांनी केले आहे.
जिल्ह्यात साखर कारखाने सुरु झाले असुन ऊस तोडणीला वेग येत आहे. पाण्याचा अतिवापर व सेंद्रिय खताच्या नगण्य वापरामुळे जमिनीचे आरोग्य वेगाने बिघडत आहे. दिवसेंदिवस जमीन टणक बनत असून त्यामुळे पिकांच्या मुळाच्या वाढीवर विपरित परिणाम होत आहे. राज्यामध्ये सुमारे 9 ते 10 लाख हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली असून जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली आहे. या क्षेत्रातून ऊस तुटुन गेल्यानंतर सरासरी 10 टन प्रति हेक्टरी इतका पाला शेतात उपलब्ध होतो. 70 ते 80 टक्के शेतकरी हा पाला जमीन स्वछ करण्याच्या हेतुने अज्ञानपणातुन जाळुन टाकतात यामुळे केवळ 5 टक्के म्हणजे सुमारे हेक्टरी 500 किलो राख शिल्लक राहते. तसेच मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदुषण होऊन उष्णतेने जमिनीचे आाणि त्यातील उपयुक्त जिवजंतु, गांडुळाची अपरिमित हानी होते. उपलब्ध ऊस क्षेत्राचा विचार केल्यास 10 लाख टन पाला नाहक जाळला जातो. ही बाब पर्यावरणाबरोबरच जैविक विविधतेला आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने दिवसेंदिवस घातक बनत आहे.
यासाठी खोडवा ऊसाचा पाला न जाळता तो पाला एक आड एक सरीत ठेवणे आवश्यक आहे.
पाचट ठेवण्याचे फायदे
👉 एक आड एक सरीत पाचटाच्या अच्छादनामुळे तण उगवू शकत नाही त्यामुळे भांगलणी व मशागतीच्या खर्चात व श्रमात 50 टक्के बचत होते.
👉 कृषी संशोधन संस्थांच्या शिफारशीनुसार ऊस पिकास हेक्टरी 2.5 ते 3.5 कोटी लिटर पाण्याचा सिंचनासाठी वापर केला जातो. पाचट ठेवल्याने आपणास केवळ रिकाम्या 50 टक्के सरीतच पाणी द्यावे लागते. परिणामी हेक्टरी 1.25 ते 1.50 कोटी लिटर पाण्याची व ते वहन करण्यासाठी आवश्यक सुमारे 100 ते 125 युनिट विजेची बचत होते. ही सध्याच्या वीज टंचाईच्या काळातील अत्यंत महत्वाची बाब आहे.
👉 राज्यामध्ये एकुण उपलब्ध सिंचन क्षमतेच्या सुमारे 57 टक्के सिंचन क्षमता सर्वसाधारण 7 ते 8 टक्के क्षेत्रावर उभे असलेल्या ऊस पिकासाठी वापरले जाते. राज्यातील पाण्याच्या कार्यक्षम वापराबाबत चिंतन करताना नेहमी ऊस पिकाचा व त्यासाठी ठिबक सिंचनाचा सात्यत्याने विचार मांडला जातो पण 50 टक्के पाणी बचत करणा-या ठिबक सिंचन पध्दतीचा प्रसार होण्यामध्ये अर्थिक गुंतवणुक, भौगोलिक परस्थिती व तुकडीकरणामुळे काही अंशी मर्यादा येत आहेत. अशावेळी विनाखर्चाचे व कमी कौशल्याचे पाचट व्यवस्थापन तंत्रज्ञान ऊस पिकातील पाणी वापराच्या कार्यक्षमतेस निश्चित उभारी देवू शकेल.
👉 पाचटाच्या पुर्ण अच्छादनामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरुन होणा-या बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. शेतात ओलाव्याचे प्रमाण (15 ते 20 दिवस ) जास्त काळ टिकुन राहते. भारनियमामुळे पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढले तरी ऊसाची वाढ चांगली होते.
👉 ऊसाच्या उत्पादनात एकरी 4 ते 6 टनांनी वाढ होते.
👉 एक एकर ऊस क्षेत्रातुन 4 ते 5 टन (हेक्टरी 8 ते 12 टन) पाचट मिळते त्यापासुन 2 ते 3 टन
(हेक्टरी 5 ते 6 टन) सेंद्रिय खत खोडवा पिकाला मिळते.
👉 पाचटाचे विघटन होत असताना त्यामध्ये असणारी अन्नद्रव्ये उदा. नत्र 40 ते 50 किलो स्फुरद 20 ते 30 किलो व पोटॅश 75 ते 100 किलो पुढील पिकास उपलब्ध होते.
👉 जमिनीचे तापमान 3 ते 5 डिग्रीने थंड राखले जाते .
👉 शेतात गांडुळाची व उपयुक्त जिवाणुची नैसर्गिकरित्या मोठ्या प्रमाणात वाढ होते त्यामुळे जमिन भुसभुसीत होऊ न हवा खेळती राहते. त्यामुळे पांढ-या मुळांची वाढ भरपुर प्रमाणात होते.
👉 पाचटातील सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक गुणधर्म सुधारतात व जलसंधारण शक्ती वाढते.
👉 पाचट कुजत असताना त्यातुन पिकाला आवश्यक असणारा कार्बनडाय ऑक्साईड वायु बाहेर पडतो त्यामुळे ऊसाची जोमदार वाढ होते.
वरील शास्त्रीय माहितीचा सारासार व गांर्भीर्याने विचार करुन आपले अज्ञान दुर करुन पर्यावरण व जमीन आरोग्याच्या दृष्टीने या बहुमोल तंत्राचा अवलंब करावा आणि आपल्या व आपल्या भावी पिढीचे जीवन सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व सचिव सुभाष चौगुले यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांचे नुकसान टळले विमला गोयंका कॉलेजच्या... Read more