Last Updated on 04 Dec 2024 6:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
भाजप विधिमंडळ गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड
मुंबई । भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात भाजप आमदारांच्या बैठकीत फडणवीस यांनी निवड करण्यात आली. पक्षाचे केंद्रीय निरिक्षक निर्मला सितारामन, विजय रूपाणी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
या बैठकीत भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, संजय कुटे, संजय सावकारे, अशोक उईके मेघना बोर्डीकर, योगेश सागर, संभाजी पाटील-निलंगेकर, गोपीचंद पडळकर, दिलीप गोडसे, आशिष शेलार यांनी अनुमोदन दिले.
गट नेता पदासाठी केवळ फडणवीस यांच्या नावाचाच प्रस्ताव आला. अन्य कोणत्याच नावाचा प्रस्ताव नसल्याचे सांगतानाच विजय रूपाणी यांनी देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते निवड करण्यात येत असल्याची घोषणा केली. तत्पूर्वी, भाजप विधिमंडळ कार्यालयात पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. पक्षाचे केंद्रीय निरिक्षक निर्मला सितारमन, विजय रूपाणी यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे.
या बैठकीस देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखेपाटील, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, अमर साबळे आदी नेते उपस्थित आहेत.
तत्पूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल नागरिकांचे आभार मानले. राज्याच्या इतिहासातलं हे सर्वात मोठं यश असून भाजपाच्या १३२ जागा निवडून आल्या आहेत. ७ अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला असून विधिमंडळात २३७ आमदारांचा गट असेल, तर भाजपचा १३२ आणि ५ अपक्ष असा गट १३७ आमदारांचा असणार आहे, असं ते म्हणाले.
साभार: प्रसार भारती









































































