Last Updated on 25 Nov 2024 9:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । देशभरात नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमडळानं आज नैसर्गिक शेतीविषयक राष्ट्रीय अभियानाला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २ हजार ४८१ कोटी रुपयांच्या या अभियानाला मंजुरी मिळाल्याचं माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
केंद्र आणि राज्य सरकारांच्या सहकार्यातून हे अभियान राबवलं जाणार असून १ कोटी शेतकऱ्यांना त्यात सामावून घेतलं जाईल . देशभरातल्या साडेसात लाख हेक्टर शेतजमीनीवर हे अभियान राबवलं जाईल. सर्वांना सुरक्षित आणि रसायनरहित अन्नधान्य मिळावं, या हेतूनं शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे, असंही ते म्हणाले.
भारताच्या पूर्व पश्चिम रेल्वे मार्गिकेमधल्या मालवाहतुकीला गती देण्यासाठी ३ रेल्वे प्रकल्पांनाही आज मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत मनमाड-भुसावळ-जळगाव दरम्यानच्या १६० किलोमीटरच्या रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी २ हजार ७७३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं
युवा विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाची मासिकं आणि अध्ययन पत्रिका उपलब्ध व्हाव्यात, यासाठी वन नेशन, वन सबस्क्रिप्शन या योजनेला मंजुरी देण्यात आली. सरकारी शिक्षणसंस्थांची संसाधनं एकत्रित करुन त्यातून विद्यार्थ्यांना ही मासिकं उपलब्ध करुन दिली जातील. यासाठी ६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अटल नवोन्मेष अभियानाच्या दुस-या टप्प्यालाही आज मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत प्रादेशिक भाषांमध्ये ३० केंद्रं आणि २ हजार ५०० प्रयोगशाळा आकांक्षित जिल्हयात विकसित केल्या जातील. पॅनकार्ड प्रणाली अद्ययावत करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत करदात्यांच्या नोंदणी व्यवस्थेत सुधारणा केली जाईल आणि एक सामायिक, व्यावसायिक ओळख क्रमांक तयार करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असं वैष्णव यांनी सांगितलं.












































































