एकविसाव्या शतकात देशांमध्ये, राज्यामध्ये विजेची कमतरता भासू लागली त्यामुळे लोडशेडिंग, अक्षय प्रकाश योजना सुरू झाली. विजेचा काटकसरीने वापर सुरू झाला. ठराविक तास गावेच्या गावे, शहरेच्या शहरे अंधारात राहण्याची वेळ आली. दिलेल्या वेळेत घरामध्ये एक बल्ब लावणे, टीव्ही न लावणे, पंखे न लावणे हे नियम घालून देण्यात आले. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी गावागावातून, शहराशहरातून पथके फिरू लागली. कालांतराने वीज टंचाई दूर झाली पण ज्या शेतीच्या, शेतकऱ्यांच्या जीवावर आपण जगतो त्या शेतीच्या पाणीपुरवठयासाठी आवश्यक असणारे विजेचे लोडशेडिंग आजही सुरूच आहे.
आठवड्यातून तीन दिवस, दिवसा तर तीन चार दिवस रात्री लाईट असते. ज्या शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेल्या अन्नावर आपण जगतो त्या माझ्या शेतकरी बापाला शेतीला पाणी पाजण्यासाठी रात्रीच्या अंधारात काटे, विंचू,साप यांची तमा न बाळगता रात्री येणाऱ्या लाईटवर शेती जगवण्यासाठी शेतीला पाणी पाजण्यासाठी रात्रभर जागत शेतात फिरावे लागते तर दुसरीकडे शहरांमध्ये विजेचा नुसता पूर वाहात आहे जणू असे वाटते. असे वाटते रात्र झालेलीच नाही. मोठमोठ्या मॉलमध्ये तर दिवस-रात्र झगमगाट चालू असतो. मोठमोठे कारखाने विजेवर रात्रंदिवस चालू असतात. मोठ-मोठे हॉटेल , धाबे यावर तर आतमध्ये दिवे असतातच इमारतीलाही लाईटच्या माळांनी नव्या नवरीसारखे नटविलेले असते. आत बाहेर वीज वापरून शिल्लक राहिलेली असते म्हणून की काय हॉटेल व धाब्यासमोरील झाडावरही लाईटीच्या माळेचे वेटोळी काय घालतात, फांद्यावर माळा काय सोडतात मग माझ्या शेतकरी बापाच्या नशीबीच अंधार का? रात्र रात्र जागणे का?
माझ्या शेतकरी बापानेच का जपून वीज वापरायची? त्याच्या जीवाची पर्वा कोणालाच नाही. त्याच्या जीवावर असणाऱ्या त्याच्या कुटुंबाची चिंता कुणालाच नाही त्याला वाली कोणीच नाही का? त्याच्या नशीबीच हे वीजनियमन का? दोन दशके उलटून गेली तरी माझ्या शेतकरी बापाला दिवसाचे २४ तास, आठवड्याचे सात दिवस, महिन्याचे तीस दिवस, वर्षाचे बारा महिने का नाही वीज पुरवू शकत. या अन्यायाविरुद्ध, या मुस्कटदाबीविरुद्ध माझा शेतकरी बाप का नाही आवाज उठवत ? कारण माझा बाप शेतीच्या बाहेर जग पाहतच नाही. कोण काय करतोय, कुणामुळे व का माझ्यावर अन्याय होतोय याचीच मुळात त्याला जाणीव नाही. शेतकरी भक्कमपणे संघटित नाही. शेतकऱ्याला स्वतःचा असा आत्मविश्वासू चेहरा नाही. त्याला असेल त्या परिस्थितीत जीवन कंठण्याची सवय झाली आहे. असेल तसे राहणे हा साधेपणा त्याने झुगारून द्यायला हवा. आजूबाजूला काय घडते आहे. माझ्या बाबतीत काय घडत आहे. याची तुलना करून माझ्यावर कोणत्या प्रकारचा अन्याय होत आहे त्याविरुद्ध मी कसे बंड करायला हवे, कोणत्या गोष्टीसाठी पेटून उठायला हवे? कोणाकडे दाद मागायला हवी? याची जाणीव व्हायला हवी. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावायला हव्यात. जपानी शेतकऱ्याप्रमाणे स्वतःचे विचार आधुनिक करून आधुनिक शेतीकडे वळायला हवे.
विजेचा कसा बेदरकारपणे उपयोग केला जातो यासाठी मी अनुभवलेले एक उदाहरण देईन. आजकाल लोकांच्या सोयीसाठी निघालेले मल्टीपर्पज हॉलमध्ये गेला तर सगळीकडे दिवेच्या दिवे दिवसाही जळताना दिसतात. त्यालाच लागून दुसरा छोटा हॉल असेल आणि तिथे काही काम किंवा मीटिंग नसेल तरी तिथे काम करणारे कामगार सर्वच लाईटस् लावून ठेवतात. अगदी लॉन, पॅसेज, वॉशरूम या ठिकाणी दिवसा गरज नसतानाही लाईट्स जळत असतात. म्हणजे विज वाया घालवू नये हे त्यांच्या गावीही नसते. त्याच्याही पुढे जाऊन कार्यक्रम आटोपून निघालेल्या लोकांनाही वीज बंद करावी, ती वाया जात आहे याच्याशी त्यांचे काही घेणेदेणेही नसते नव्हे ते आपले कर्तव्यच नाही असे समजतात. मी तर जिथे गरज नाही तिथे लाईट जळत असतील तर जाणीवपूर्वक स्वतः बंद करते. कारण तेव्हा मला माझ्या डोळ्यासमोर अंधारात चाचपडत एवढ्याशा बॅटरीच्या उजेडात शेतात वाट शोधणारा शेतकरी बाप माझ्या डोळ्यासमोर येत असतो.
टीप – माझी शेती वाटेकरी करत असला तरी माझा अन्नदाता मला माझा बापच वाटतो.
लेखिका : सायराबानू वजीर चौगुले
माणगाव, रायगड
मोबा. ८४८४९३२१४६