Last Updated on 23 Nov 2024 8:16 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । पंधराव्या विधानसभेच्या निर्मितीसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. २८८ जागांपैकी ,२३२ जागांवर निर्णायक आघाडी घेत, महायुतीनं हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. आता बहुतांश निकाल हाती आले असून, भाजपानं १३२ जागांवर, शिवसेनेनं ५५ जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसनं ४१ जागांवर विजय किंवा आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला केवळ २१, काँग्रेसला केवळ १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केवळ १० जागांवर यश मिळालं आहे. दोन जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत, एका जागेवर समाजवादी पक्षाला यश मिळालं आहे.
राज्यातल्या दोन आघाडया आणि सहाही पक्षांसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत मतदार राजांनं निर्णायक कौल देत, स्थिर सरकार येण्याची व्यवस्था महाराष्ट्रात केली आहे. गेली पाच वर्ष महाराष्ट्रात चाललेल्या राजकीय गोंधळालाही या निकालांमुळे विराम मिळेल, अशी अपेक्षा आहे. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेची निवडणुकही अटीतटीची होईल, असा अंदाज सर्वच विश्लेषकांनी बांधला होता, त्यामुळे कोणालाही निर्णायक बहुमत मिळणार नाही, पासुन ते त्रिशंकु विधानसभेत अपक्ष किंगमेकर ठरतील, असे अंदाज वर्तवले जात होते. मात्र पुन्हा एकदा विश्लेषकांना खोट ठरवत, जनतेनं महायुतीला एकतर्फी आणि निर्णायक कौल दिला आहे. अनेक मुद्दयांवर ही निवडणुक लढली गेली, त्यातही महिलांचा वाढलेला मतदानाचा टक्का लाडकी बहीण योजनेला मिळालेला प्रतिसाद होता, असं दिसत आहे. तसंच विकास आणि हिंदुत्व या दोन्हींचा संगम जनतेला भावलेला जाणवतो आहे.
महायुतीनं व्युहरचना करुन, केलेला प्रचारही प्रभावी ठरल्याचं दिसत आहे. अनेक पक्षांसाठी अस्तित्वाच्या असलेल्या या लढाईतही जनतेनं उत्तर दिलं आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे पक्ष ठरले आहेत. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असून, जेमतेम साठ जागांपर्यंत त्यांना मजल मारता आली आहे. अनेक दिग्ग्जांना या निवडणुकीत पराभवाचा फटका बसला. प्रस्थापित आणि घराणेशाहीच्या राजकारणाला कुठेतरी लगाम घालणारी ही निवडणुक ठरली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातल्या ७० जागांपैकी भाजपा २९ जागांवर, शिवसेना ८ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस १५ जागांवर आघाडीवर
राष्ट्रवादी काँगेस शरद पवार पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात महायुतीनं जोरदार मुसंडी मारली आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या ७० जागांपैकी भाजपा २९ जागांवर, शिवसेना ८ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस १५ जागांवर आघाडीवर आहे. शरद पवार यांना इथं केवळ ६ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला केवळ २ जागांवर आघाडी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे १० पैकी १० ही उमेदवार विजयी झाले आहेत. करवीर इथून शिवसेनेचे चंद्रदीप नरके, कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, कोल्हापूर दक्षिण मधून भाजपाचे अमल महाडीक, इचलकरंजीतून राहुल आव्हाडे, हातकणंगलेतून अशोक माने, पन्हाळातून विनय कोरे, कागलमधून हसन मुश्रीफ तर चंदगडमध्ये भाजप बंडखोर शिवाजी पाटील विजयी झाले आहेत. शिरोळ विधानसभा मतदार संघात शिवसेना पुरस्कृत उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा विजय झाला आहे. सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या आठही जागांवर महायुतीनं विजय मिळवल्यामुळे एकेकाळचा काँग्रेस आणि शरद पवारांचा गड ढासळला आहे. भाजपानं ४, शिवसेनेनं २ तर राष्ट्रवादी काँग्रेसनंही २ जागा जिंकत जिल्ह्यात महायुतीचं वर्चस्व प्रस्थापित केलं. कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करत भाजपाचे अतुल भोसले विजयी झाले आहेत साताऱ्यात भाजपाच्या शिवेंद्र राजे-भोसले यांनी सुमारे पावणेदोन लाख मत घेत शिवसेना उबाठा पक्षाच्या अमित कदम याचा पराभव केला. या मतदार संघामध्ये कराड उत्तर आणि कराड दक्षिणमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. वाई मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील, कोरेगावमध्ये शिवसेनेचे महेश शिंदे तर फलटणमध्ये सचिन पाटील विजयी झाले आहेत. पाटणमध्ये शंभुराज देसाई यांनी विजय मिळवला आहे. तर कराड उत्तर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील यांच्यावर मात करत भाजपाच्या मनोज घोरपडे यांनी विजयश्री खेचून आणली. माण मतदार संघात भाजपाचे जयकुमार गोरे पुन्हा विजयी झाले आहेत.
अमरावती जिल्ह्यात आठ पैकी सात जागांवर महायुतीचा दणदणीत विजय
अमरावती जिल्ह्याचा निकाल अमरावती पश्चिम विदर्भातील महत्त्वाचा जिल्हा व राजकीय दृष्ट्या हाय व्होल्टेज नेते असलेला अमरावती जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघाचा निकाल हाती आला आहे. यंदा प्रथमच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांची महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीचे उमेदवार प्रथमच रिंगणात होते. आटातटीच्या झालेल्या या लढतीमध्ये अमरावती जिल्ह्यात बहुतांश मतदार संघामध्ये महायुतीने भाजी मारली आहे. यामध्ये अमरावती मतदारसंघात महायुती मधील अजित पवार गटाच्या सुलभा खुडके विजय झाले आहे दर्यापूर मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गजानन लवटे विजय झाले आहेत धामणगाव रेल्वे मतदारसंघात अटातटीच्या झालेल्या लढतीमध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचे प्रताप अडसूळ विजय झाले आहेत. वीस वर्षापासून अपक्ष आमदार म्हणून अचलपूर मतदारसंघातून निवडून येणारे बच्चू कडू हे यंदा तिसऱ्या क्रमांकावर गेले आहे दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे बबलू देशमुख होते तर भारतीय जनता पक्ष महायुतीचे प्रवीण तायडे या मतदारसंघात विजयी झाले. मेळघाट मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे केवळ राम काळे यांनी एक लाखाचा मताधिक्य घेत विजय संपादन केला आहे बडनेरा मतदारसंघातून महायुतीतील युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा विजयी झाले तर दिवसा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे राजेश वानखडे यांनी विजय संपादन केला. वरुड व मोर्शी मतदारसंघातून आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात उभे असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रवीण यावलकर यांनी विजय संपादन केला. अमरावती जिल्ह्यातील आठ पैकी सात विधानसभा मतदारसंघांवर मतदार महायुतीचे उमेदवार विजय ठरले आहे तर दर्यापूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे गजानन लवटे विजय झाले आहेत. अमरावती जिल्ह्यावर भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या एक हाती सत्तेमुळे जिल्ह्यात विविध पक्षांकडून आनंद उत्सव साजरा केला जात आहे अनेक ठिकाणी नेत्यांनी मिरवणुका काढल्या आहेत.
मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात भाजप १३ जागावर विजयी
विधानसभा निवडणुकीत मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात भाजपला १३, शिवसेना ६, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष ६, कॉंग्रेस ३ आणि समाजवादी पक्षाचे १ उमेदवार विजयी झाले आहेत. उत्तर मुंबईतल्या बोरिवलीत भारतीय जनता पक्षाच्या संजय उपाध्याय यांना १ लाख ३९ हजार ९४७ मतं मिळाली. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय भोसले यांना ३९ हजार ६९० मतं मिळाली. बोरिवलीत भारतीय जनता पक्षाच्या संजय उपाध्याय यांनी १ लाख २५७ मतांनी संजय भोसले यांचा पराभव केला. वर्सोवा इथं भाजपच्या डॉ. भारती लव्हेकर यांचा पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हारुन खान यांनी पराभव केला. हारुन खान १ हजार ६०० मतांनी विजयी झाले. विधानसभा निवडणुकीत भाजपनं चांगलं मताधिक्य मिळवतं यश संपादन केलं आहे. महायुतीच्या विजयी उमेदवारानं जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
विरोधी पक्षाच्या अनेक दिग्गजांचा पराभव
विधानसभा निवडणुकीत ठाण्यातल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १ लाख २० हजार ७१७ मतांनी विजयी झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून ६४ हजार ८७३ मतांनी विजयी झाले. राज्यात सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघातून अजित पवार १ लाख ८९९ मताधिक्यानं विजयी झाले. आजच्या निकालात, विरोधी पक्षाच्या अनेक दिग्गजांना पराभव पत्करावा लागला, कराड मतदारसंघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपच्या, अतुल भोसले यांनी पराभव केला. संगमनेर मतदारसंघात काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांचा शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी १० हजार ५६० मतांनी पराभव केला. घनसावंगी मतदारसंघात माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या बच्चू कडू यांनाही अचलपूर मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदे यांनी रोहित पवार यांचा पराभव केला. छत्रपती संभाजीनगरमधल्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघात अतुल सावे यांनी एआयएमआयएम पक्षाच्या इम्तियाज जलील यांच्यावर निसटता विजय मिळवला. राज्य मंत्रिमडळातील छगन भुजबळ, अदिती तटकरे, उदय सामंत, दीपक केसरकर, दिलीप वळसे-पाटील , तानाजी सावंत , हसन मुश्रीफ आपापल्या मतदारसंघात विजयी झाले. इस्लामपूरमध्ये अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जयंत पाटील विजयी झाले. तर तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्रात रोहित पाटील विजयी झाले. अहेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा अत्राम त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार भाग्यश्री अत्राम यांच्याविरोधात विजयी झाले. बडनेरा मतदारसंघात रविराणा विजयी झाले.
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा नेहमीच प्रभाव राहिला आहे. काँग्रेसने येथून सात वेळा विजय मिळवला आहे. मात्र, यावेळी भाजपच्या अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. अतुल भोसले यांना एकूण १ लाख ३७ हजार २८९ मत मिळाली. तर, पृथ्वीराज चव्हाण यांना एकूण ९८ हजार ७४४ मत पडली म्हणजेच त्यांचा ३८ हजार ५४५ मतांनी पराभव झाला. कराड दक्षिण मतदारसंघातून एकूण ८ जण निवडणूक लढवत असून पृथ्वीराज चव्हाण हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
रत्नागिरी जिल्ह्यात पाचपैकी चार जागांवर महायुतीचा विजय
रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघांमध्ये महायुतीचा विजय झाला आहे. रत्नागिरीत उदय सामंत, राजापूरमध्ये त्यांचे बंधू किरण सामंत आणि दापोलीत योगेश कदम हे शिवसेनेतर्फे विजयी झाले. चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम जिंकले. फक्त गुहागरची जागा भास्कर जाधव यांच्या रूपाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीला मिळाली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार उदय सामंत ४१,५९० मतांनी विजयी झाले. सामंत यांना १ लाख ११ हजार ३३५ मतं मिळाली. सामंत या विधानसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उभे राहिलेले सुरेंद्र तथा बाळ माने यांना ६९ हजार ७४५ मतं मिळाली. जागावाटपात रत्नागिरी मतदारसंघ भाजपला न मिळाल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते बाळ माने यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे योगेश कदम २४ हजार ९३ मतांच्या आघाडीसह विजयी झाले आहेत. त्यांना १ लाख ५ हजार ७ मतं मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय कदम ८० हजार ९१४ मतं मिळाली. योगेश कदम सलग दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. मनसेच्या संतोष अबगुल यांना तिसऱ्या क्रमांकाची ४९६० मतं मिळाली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव दोन हजार ८३० मतांच्या आघाडीसह विजयी झाले आहेत. त्यांना ७१ हजार २४१ मतं मिळाली. शिवसेना पक्षाचे राजेश बेंडल यांना ६८ हजार ४११ मतं मिळाली. भास्कर जाधव सलग चौथ्यांदा आमदार झाले आहेत. मनसेच्या प्रमोद गांधी यांना तिसऱ्या क्रमांकाची ६७१२ मतं मिळाली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे उभे राहिलेले किरण सामंत १९ हजार ६७७ मतांच्या आघाडीसह विजयी झाले आहेत. त्यांना ८० हजार २५६ मतं मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन साळवी यांना ६० हजार ५७९ मतं मिळाली. किरण सामंत हे उदय सामंत यांचे बंधू असून, ते पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. सलग तीन वेळचे आमदार असलेल्या राजन साळवी यांचा त्यांनी पराभव केला आहे. काँग्रेसला जागा मिळाली नाही म्हणून नाराज होऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले अविनाश लाड यांना तिसऱ्या क्रमांकाची ७९४५ मतं मिळाली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेखर गोविंदराव निकम सहा हजार ८६७ मतांच्या आघाडीसह विजयी झाले आहेत. त्यांना ९६ हजार ५५५ मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवडणूक लढवत असलेले प्रशांत यादव यांना ८९ हजार ६८८ मतं मिळाली. शेखर निकम सलग दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या आणि राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या यादव यांनी निकम यांना तगडं आव्हान दिलं; मात्र अखेर निकम विजयी झाले. अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या आणि नामसाधर्म्य असलेल्या शेखर गंगाराम निकम यांना तिसऱ्या क्रमांकाची १६१३ मतं मिळाली.
विरोधक सावत्र भाऊ, महायुतीला बहुमत मिळताच मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात
विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला सावत्र भाऊ असं संबोधलं. ते म्हणाले की, विरोधक सावत्र भाऊ, आमच्या योजनांमध्ये आडकाठी आणतील हे माहिती होती, म्हणून ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले. कागदावर योजना ठेवण्यासाठी आम्ही केल्या नाही.
राज्यात सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काहीतरी करतंय ही भावना निर्माण झाली. जनतेनं विकासाला स्वीकारलं.
फडणवीसांची प्रतिक्रिया
दरम्यान आजच्या निकालावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एखाद्याला जर जाणून बुजून टार्गेट करण्यात आलं तर ते लोकांच्या लक्षात येतं. महाविकास आघाडीनं फेक नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला पण यावेळी तो फसला, महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र विधानसभेचे निकाल अनपेक्षित आणि अनाकलनीय – उद्धव ठाकरे
गोपीचंद पडळकर यांचा विजय, काँग्रेसच्या आमदाराला चारली धूळ
जत विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार गोपीचंद पडळकर विजयी झाले. काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांचा पडळकर यांनी पराभव केला. तब्बल 35 हजारांचे मताधिक्य घेत पडळकर विजयी झाले.
अब्दुल सत्तारांचा चौकार !
सिल्लोड विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुरेश बनकर या उमेदवाराचा पराभव करत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार विजयी ठरले आहेत.
नागपूरमध्ये कोणत्या मतदारसंघात कुणाचा विजय, पाहा यादी
नागपूर जिल्ह्यातील विधानसभा
उमरेड – काँग्रेस , संजय मेश्राम विजय
हिंगणा – भाजपा, समीर मेघे विजय
काटोल – भाजपा, चरणसिंग ठाकूर विजय
सावनेर – भाजपा, आशिष देशमुख विजय
रामटेक – (शिवसेना एकनाथ शिंदे) आशिष जैस्वाल विजय
पूर्व नागपूर – भाजपा, कृष्णा खोपडे विजय
दक्षिण पश्चिम नागपूर – भाजपा, देवेंद्र फडणवीस विजय
उत्तर नागपूर – काँग्रे,स, नितीन राऊत विजय









































































