Last Updated on 21 Nov 2024 8:06 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी-बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे.
महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दोन सत्रात घेण्यात येत असून पहिले सत्र सकाळी ११:०० ते दुपारी २:०० आणि दुसरे सत्र दुपारी ३:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत असणार आहे. दहावीची परीक्षा पहिल्या दिवशी मराठी भाषेच्या पेपरने सुरू होईल आणि बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. तसेच, दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी २०२५ मध्ये जारी करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध केले जाईल.
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे या बाबींचा सारासार विचार करता सन २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावी-बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा ८ ते १० दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी २०२५ मध्ये जारी करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध केले जाईल. त्यामुळे, विद्यार्थ्यांना आता परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अडीच ते ३ महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे.
दहावी-बरावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक…
👉 बारावी लेखी परीक्षा – ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५
👉 बारावी – प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५
👉 दहावी लेखी परीक्षा – २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५
👉 दहावी – प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा ३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी
व्हायरल वेळापत्रकांवर विश्वास ठेऊ नका
या कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर आजपासून (दि. २१) उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असंही मंडळाकडून कळविण्यात आले आहे.
सीबीएसई बोर्डच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा जाहीर
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी पासून सुरु होणार असल्याची घोषणा आज सीबीएसईनं केली. दहावी बोर्डाच्या परीक्षा १८ मार्चला तर बारावीच्या परीक्षा ४ एप्रिल रोजी संपतील. सीबीएसई नं यावर्षी पहिल्यांदाच परीक्षेच्या ८६ दिवस आधीच वेळापत्रक जाहीर केलं असून प्रत्येक विषयाच्या परीक्षेमध्ये पुरेसा अवधी राखण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक विविध प्रवेश परीक्षांच्या तारखा लक्षात घेऊन ठरवण्यात आल्या आहेत. एका दिवशी कोणत्याही दोन विषयांची परीक्षा येऊ नये याची काळजी घेऊन ४०हजार विषयांच्या पर्यायांची पडताळणी करून बोर्डानं हे वेळापत्रक तयार केलं आहे.












































































