Last Updated on 20 Nov 2024 11:08 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यातील २८८ विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. संध्याकाळी ६ वाजता ही मतदान प्रक्रिया संपणार आहे. निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांसारखे प्रमुख नेते आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांनी निवडणूक प्रचारात सहभाग घेतला. महायुतीला सरकार टिकवण्याचं तर महाविकास आघाडीला सत्ता आणण्याचं मोठं आव्हान आहे. राज्यातील २८८ जागांवर एकूण ४१३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून या सर्व उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
गेले महिनाभर कर्णकर्कश प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आज, बुधवारी होत असून, त्यात ४,१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. ९ कोटी ७० लाख मतदार मतदानाचा हक्क बजाविणार असले तरी मुंबई, ठाणे आणि पुण्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस आहे.
राज्यातल्या २८८ मतदार संघांमध्ये एकंदर ४१३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत; यात ३६३ महिला उमेदवारांचा समावेश आहे. विविध १५८ पक्षांनी, २०५० उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे, तर उर्वरित २०८६ अपक्ष उमेदवार आहेत. सर्वाधिक २३७ उमेदवार बहुजन समाज पार्टीनं उभे केले असून, वंचित बहुजन आघाडीचे २०० उमेदवार रिंगणात आहेत. भाजपानं १४९, मनसेनं सव्वाशे, काँग्रेसनं १०१ उमेदवारांना निवडणुकीत उतरवलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ९५, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ८६, शिवसेनेकडून ८१, आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ५९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे ९३, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे ३२, प्रहार जनशक्तीचे ३८, माकपाचे ३, एम. आय. एमचे १७, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे ४, जनसुराज्य शक्तीचे ६, शेकापचे १८, समाजवादी पार्टीचे ९ आणि भाकपाचे २ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
मुंबईत मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई शहर जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्तआयुक्त आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर) डॉ. अश्विनी जोशी, मुख्य सचिव सुजाता सौनिक,माजी राज्यपाल राम नाईक आदींनी सकाळी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा अधिकार बजावला.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बजावला मतदानाचा हक्क
राज्यात मतदानाला सुरवात झाली आहे. राज्यात सकाळ पासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी कुलाबा मतदारसंघातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
सचिन तेंडुलकर यांनी बजावला मतदानाचा हक्क; मतदारांनाही केलं आवाहन

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. ‘मतदान करा. ही आपली जबाबदारी आहे. घरातून बाहेर या. मतदान केंद्रांवर चांगले नियोजन करण्यात आलेले आहे’, असे त्यांनी आवाहन केले आहे.
अजित पवारांनी मूळ गावात जाऊन बजाविला मतदानाचा हक्क
महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी भोर मतदारसंघात मतदानाचा हक्क बजाविला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मूळ गावी जाऊन हातनोशी येथे जाऊन मतदान केले.
अजित पवार मतदान केल्यानंतर म्हणाले, “लोकसभा निवडणुकीतही आमच्याच कुटुंबातील दोन लोक एकमेकांच्या विरोधात उभे होते. ती निवडणूक सर्वांनी पाहिली आहे. यावेळीही ते घडले आहे, मला विश्वास आहे की बारामतीची जनता मला विजयी करेल.
माजी राज्यपाल राम नाईक यांनी पहाडी शाळेत बजाविला मतदानाचा हक्क
भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी गोरेगाव पहाडी शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनीही बजावला मतदानाचा हक्क
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सकाळी सात वाजता मतदान केंद्रावर जात मतदानाचा हक्क बजावला.
पुण्यात ८८ लाख मतदार मतदान करणार
पुणे जिल्ह्यात ८८ लाख मतदारांना मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विधानसभा निवडणुकीत मतदारांना सहज सुलभ मतदान करता यावे, म्हणून जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यातील ८८ लाख ४९ हजार मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ८,४६२ मतदान केंद्र आहेत. मतटक्का वाढविण्यासाठी मतदार यादीतील नाव शोधण्यापासून ते दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात सकाळपासून रांगा लागलेल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील ३४५२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरूवात
कोल्हापूर जिल्हयात सकाळी ७ वा.पासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली आहे. एकुण १० विधानसभा मतदार संघात ३४५२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरळीत सुरूवात झाली. सर्वच ठिकाणी मतदानाचा उत्साह मतदारांमध्ये दिसून येत असून सकाळी सर्वात आधी पहिल्या तासामध्ये अगदी ८५ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. निवडणूक विभागाकडून त्या जेष्ठ नागरिकांना मतदान केल्यानंतर प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येत आहे. जिल्हयात ऐंशी हजाराहून अधिक जेष्ठ नागरिक मतदार यादीत आहेत. त्यापैकी ४४३० मतदारांनी गृहमतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला. उर्वरीत गृह मतदान नाकारलेले मतदार मतदान केंद्रांवर येत असल्याचे आज सकाळपासूनच दिसून येत आहे. उपस्थित जेष्ठ नागरिकांनी इतर वयोगटातील मतदारांना जणू काही एक आदर्शच घालून दिला. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांना मतदान करण्याचे आणि जिल्ह्याच्या ऐतिहासिक घटनेचे साक्षिदार होण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यावेळी ८० टक्केहून पुढे जात जिल्ह्याची मतदान टक्केवारी राज्यात अग्रेसर ठेवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे असेही आवाहन करण्यात येत आहे.
निकाल कधी येणार?
२३ नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. दुपारपर्यंत कोणता पक्ष किंवा आघाडी नवीन सरकार स्थापन करणार हे स्पष्ट होईल.
नदीवर पूल नसल्याने मतदान केंद्रावर बैलगाडीद्वारे…
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याच्या सात्री गावाला पूल नसल्याने आणि बोरी नदीला पुराचे पाणी आल्याने निवडणूक कर्मचारी आणि ईव्हीएम सह सर्व साहित्य बैलगाडीवर मतदान केंद्रावर नेण्यात आले. अमळनेर मतदार संघाचे मतदान केंद्र क्रमांक ७ सात्री येथे आहे. या गावाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून पूल नाही. गाव निम्न तापी प्रकल्प पाडळसरे मध्ये बुडीत क्षेत्रात येत असल्याने गावाला पूल होत नाही. त्यामुळे ही नदी ओलांडण्यासाठी बैलगाडीतून ऐल तटावरून पैल तटावर जाण्याचा मार्ग निवडणूक प्रशासनाने काढला.
राज्यभरात कायदा व सुरक्षा यंत्रणा सतर्क व सजग
राज्यभरात २ लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा यंत्रणांचे कर्मचारी तैनात
‘महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४’ अंतर्गत बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यभरात मतदान होत आहे. ही सर्व प्रक्रिया शांततेत व खुल्या वातावरणात संपन्न व्हावी, यासाठी राज्यभरात २ लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलासोबत गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य सशस्त्र पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दलाचा समावेश आहे. या सर्व यंत्रणेला सतर्क आणि सजग राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहिता कालावधी दरम्यान आचारसंहिता व निवडणूक विषयक विविध तक्रारींच्या अनुषंगाने ५३२ एफ. आय. आर. दाखल झाले आहेत. यापैकी २१० प्रकरणे ही आदर्श आचारसंहितेच्या भंगाशी संबंधित असून ६३ प्रकरणे ही समाज माध्यमांशी संबंधित आहेत. तर उर्वरित २५९ प्रकरणे ही इतर बाबींशी संबंधित आहेत.
‘एफ आय आर‘ बद्दलची जिल्हा निहाय आकडेवारी :










































































