सांगली । बहे (ता. वाळवा) येथील श्रीक्षेत्र रामलिंग बेटावर संतपंगतीने भाविक अन् पर्यटक तृप्त झाले. शुक्रवारी येथील बेटावर निसर्गाच्या सानिध्यात भाविक आणि पर्यटकांनी या संत पंगतीचा आस्वाद घेतला.
रामलिंग बेटावर शुक्रवारी इस्लामपूर येथील नारायण कुंभार, प्रकाश शिरोळे, पृथ्वीराज मंडलिक, बबनराव पाटील यांनी संतपंगतीच्या माध्यमातून वनभोजनाचा बेत आखला होता. गरमागरम बाजरीची भाकरी.त्याबरोबर जरासा मिरचीचा ठेचा…लिंबू…कांदा अन् दही त्याचबरोबर शिरा आणि मसालेभात असं लज्जतदार जेवण या संतपंगतीला होते. हे लज्जतदार भोजन मदन अरबुने यांनी बनवले.
या लज्जतदार वनभोजनाचा स्थानिक ग्रामस्थ तसेच येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी व पर्यटकांनी आस्वाद घेतला. पश्चिम महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील रामलिंग बेटावर दररोज मोठ्या प्रमाणात भाविक, पर्यटक येत असतात. कौटुंबिक पर्यटक येताना जेवणाचे डबे घेवूनच येत असतात. निसर्गाच्या सानिध्यात बसून वन भोजनाचा आस्वाद घेत असतात.