👉 उच्च शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर यांनी दिले निर्देश
👉 विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकांना या बाबी लागू होत नाहीत.त्यामुळे सदरचे परिपत्रक पत्र रद्द करावे : एम.फुक्टो
पुणे । राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचार कामात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांचेविरूद्ध विद्यापीठे व संबंधित संस्थांनी शिस्तभंगविषयक कठोर कारवाई करावी असे निर्देश उच्च शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर यांनी सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलसचिवांना दिले आहेत. दरम्यान, या बाबी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकांना लागू होत नाहीत.त्यामुळे सदरचे परिपत्रक पत्र रद्द करावे अशी मागणी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने (एम.फुक्टो) केली आहे.
याबाबत उच्च शिक्षण विभागाने ५ नोव्हेंबर रोजी याबाबत एक परिपत्र जारी केले आहे. या परिपत्रकात म्हटले आहे की, सध्या राज्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. या आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता नियमाचे पालन करण्याबाबतचे विविध प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत. निवडणूक आयोग यांचे आचारसंहिता पालनासंदर्भातील निर्देश, त्याचप्रमाणे शासन निर्णय दि.२० मे, २०१० अन्वये राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी सामाईक परिनियम (Common Statutes) अस्तित्वात येईपर्यंत महाराष्ट्र नागरी सेवा नियमातील तरतूदी लागू करण्यात आलेल्या आहेत. करिता, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ५(१) मध्ये नमूद केल्यानुसार, कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेचा सदस्य होता येणार नाही. किंवा त्याचेशी अन्यथा संबंध ठेवता येणार नाही किंवा कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा कार्यात कोणत्याही प्रकारे भाग घेता येणार नाही किंवा सहाय्य करता येणार नाही. तसेच ५(४) नुसार तो कर्मचारी कोणत्याही विधानसभेच्या किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या निवडणूकीत प्रचार करू शकणार नाही किवा अन्यथा हस्तक्षेप करू शकणार नाही किंवा त्यासंबंधी आपले वजन खर्च करू शकणार नाही किंवा त्यात भाग घेऊ शकणार नाही, याकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे.
तरी, राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचार कामात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांचेविरूद्ध विद्यापीठे व संबंधित संस्थांनी शिस्तभंगविषयक कठोर कारवाई करावी.या अनुषंगाने सदर परिपत्रक आपले अधिनस्त सर्व विद्यापीठीय व महाविद्यालयौन अधिकारी व कर्मचारी यांचे निदर्शनास आणण्यात यावे असे परिपत्रकात म्हटले आहे.
तसेच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आपल्या अधिनस्त महाविद्यालयातील पात्र विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना मतदान करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करावे असेही या परिपत्रकात शेवटी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने उच्च शिक्षण संचालकांना दिलेल्या पात्रात म्हटले आहे की, केंद्रीय निवडणूक आयोगाने आदर्श निवडणूक आचारसंहिता पालनाची जबाबदारी सर्व भारतीय नागरिकांची असून आचारसंहिता भंग करणाऱ्या व्यक्ती/संस्था यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार निवडणूक आयोगास भारतीय संविधानाने दिलेला आहे.आपल्या वरील संदर्भीय पत्रामधील संदर्भ क्रमांक दोन व तीन चा उल्लेख करून विद्यापीठे व संलग्रित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचार कामात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांच्याविरुद्ध विद्यापीठे व संबंधित संस्थांनी शिस्तभंग विषयक कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. संदर्भीय पत्रातील संदर्भ क्रमांक दोन व तीन या बाबी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकांना लागू होत नाहीत. विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकांच्या सेवाशर्ती परिनियमांनी नियंत्रित केल्या जातात याची जाणीव उच्च शिक्षण संचालकास असू नये याचे आश्चर्य वाटते. अशाप्रकारे आचारसंहितेच्या काळात उच्च शिक्षण संचालकांनी कारवाईचे निर्देश देणे हाच आचारसंहितेचा भंग असून भारतीय संविधानाने नागरिकास दिलेल्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. सदरची बाब राज्याच्या प्रभारी उच्च शिक्षण संचालकाच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे. त्याचबरोबरसंदर्भीय पत्र रद्द न केल्यास निवडणूक आयोगाकडे आपणा विरोधात तक्रार केली जाईल याची जाणीव करून देण्यात येत आहे.